अश्विन अष्टपैलूची उणीव भरून काढेल
By Admin | Updated: August 3, 2015 00:38 IST2015-08-03T00:38:15+5:302015-08-03T00:38:15+5:30
रवीचंद्रन अश्विनमध्ये भारतीय कसोटी संघात अष्टपैलूची उणीव भरून काढण्याची क्षमता आहे, असा विश्वास भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला.

अश्विन अष्टपैलूची उणीव भरून काढेल
चेन्नई : रवीचंद्रन अश्विनमध्ये भारतीय कसोटी संघात अष्टपैलूची उणीव भरून काढण्याची क्षमता आहे, असा विश्वास भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला.
श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला रवाना होण्यापूर्वी एमसीए स्टेडियम येथे पत्रकार परिषदेत बोलताना विराट म्हणाला,‘‘अश्विन, भुवनेश्वर आणि हरभजन यांच्यामध्ये चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनची फलंदाजीमध्ये सरासरी ४० ची आहे. त्यामुळे तो अष्टपैलूची उणीव पूर्ण करू शकतो. हे एक आव्हान असले, तरी ते पेलण्याची त्याच्यात क्षमता आहे. संघाला विजयाची संधी मिळावी, यासाठी पाच गोलंदाजांसह खेळण्यास पसंती राहील आणि मालिकेदरम्यान तीन फिरकीपटूंनाही संधी देण्याबाबत विचार करीत आहे.’’
विराट पुढे म्हणाला, ‘‘कसोटी सामना जिंकण्यासाठी गोलंदाजी आक्रमण मजबूत असणे आवश्यक असते. त्यामुळे तीन फिरकीपटूंना संधी देण्याबाबत विचार करीत आहे. आमचे लक्ष्य २० बळी घेण्याचे आहे. विजय मिळविण्यासाठी सर्वोत्तम गोलंदाजांसह खेळणे आवश्यक आहे. पाच गोलंदाजांना संधी देणे म्हणजे आघाडीच्या सहा फलंदाजांना अधिक जबाबदारी स्वीकारावी लागेल.’’
कोहलीने विजयच्या फिटनेसबाबत काही समस्या नसल्याचे सांगितले. आघाडीच्या फळीतील तो महत्त्वाचा फलंदाज आहे. तो पूर्णपर्ण फिट आहे. तो सामन्यासाठी सज्ज असेल, असा मला विश्वास आहे.’’ आघाडीच्या फळीसाठी के. एल. राहुल आणि शिखर धवन असल्यामुळे चांगली स्पर्धा आहे. राहुल चांगली फलंदाजी करीत असून, शिखर कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरला आहे. या वेळी कोहलीने रोहित शर्माची पाठराखण केली. कोहली म्हणाला, ‘‘रोहित प्रतिभावान खेळाडू आहे. वन-डेमध्ये तो आघाडीच्या फळीत खेळतो, पण कसोटी क्रिकेटचा विचार करता परिस्थिती बदलेली असते. कसोटीमध्ये तो सहाव्या क्रमांकावर खेळतो. त्याला सूर गवसला, तर एका सत्रात सामन्याचे पारडे फिरवू शकतो. आॅस्ट्रेलियात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याला अधिक संधी मिळणे आवश्यक आहे.’’ (वृत्तसंस्था)