अश्विन 'क्रिकेटर ऑफ द ईअर'
By Admin | Updated: December 22, 2016 16:38 IST2016-12-22T14:57:22+5:302016-12-22T16:38:13+5:30
आपल्या फिरकीने प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवणारा भारताचा अव्वल गोलंदाज रविचंद्रन अश्विनला आयसीसीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.

अश्विन 'क्रिकेटर ऑफ द ईअर'
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - कसोटी सामन्यांमध्ये आपल्या फिरकीने प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवणारा भारताचा अव्वल गोलंदाज रविचंद्रन अश्विनला आयसीसीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दिल्या जाणा-या 'क्रिकेटर ऑफ द इअर' पुरस्कारासाठी अश्विनची निवड झाली आहे. राहुल द्रविड (2004) आणि सचिन तेंडुलकर (2010) यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारा अश्विन तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
यावर्षी अश्विनने 12 कसोटी सामन्यांमध्ये 72 विकेट मिळवल्या. त्यासाठी अश्विनला 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअर'चाही पुरस्कार मिळाला आहे. इथेही राहुल द्रविड (2004) आणि गौतम गंभीर (2009) यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमधला हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारा अश्विन भारताचा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी संघामध्ये स्थान मिळवणारा अश्विन एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार विराट कोहलीला आयसीसीच्या एकदिवसीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारताकडून 4-0 असा मानहानीकारक पराभव होऊनही इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलिस्टर कूकला आयसीसीच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आले आहे. तिस-यांदा कूकची आयसीसीच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.