अश्विनला अर्जुन पुरस्कार प्रदान
By Admin | Updated: August 1, 2015 00:38 IST2015-08-01T00:38:57+5:302015-08-01T00:38:57+5:30
भारताचा आघाडीचा आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचा शुक्रवारी केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अर्जुन पुरस्कार प्रदान करुन गौरव केला. गतवर्षी अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर

अश्विनला अर्जुन पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचा शुक्रवारी केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अर्जुन पुरस्कार प्रदान करुन गौरव केला. गतवर्षी अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर २९ आॅगस्ट २०१४ रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी अश्विन इंग्लंड दौऱ्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत असल्याने अनुपस्थित होता.
भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जाणाऱ्या अश्विनने आतापर्यंत २५ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना १२४ बळी घेतले आहेत. तसेच एकूण ९९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळताना १३९ बळी मिळवले आहेत. त्याचप्रमाणे २५ टी-२० सामन्यांतून अश्विनने २६ बळी टिपले आहेत.
हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना अश्विनने सांगितले की, ‘माझा आतापर्यंतचा क्रीडा प्रवास खुप चांगला झाला आहे. मी अनेक बाबतींमध्ये नशीबवान ठरलो असून यासाठी मी देवाचे आभार मानतो. देशाकडून खेळण्याची संधी मिळणे यासाठी खुप नशीबवान ठरलो आणि आज क्रीडामंत्र्यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार मिळणे हा मोठा सम्मान आहे.’
दरम्यान यावेळी अश्विनने आगामी १२ आॅगस्टपासून खेळविण्यात येणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी पुर्णपणे सज्ज असून कोणत्याही दडपणाशिवाय खेळण्याचा पुर्ण आनंद घेत असल्याचेही सांगितले. याबाबतीत अधिक सांगताना अश्विन म्हणाला की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आम्हाला कायमच दडपणाखाली खेळण्याची सवय असल्याने दबाव आमच्यासाठी मोठी गोष्ट नाही. सध्या माझी कामगिरी चांगली होत असून, लंकेतील परिस्थितीशी लवकरात लवकर स्वत:ला जुळवून चांगल्या कामगिरीचा माझा प्रयत्न असेल.’ नोव्हेंबर २०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेला कसोटी सामना अश्विनचा १९वा सामना होता आणि या सामन्यात त्याने आपल्या बळींचे शतक पुर्ण केले होते. विशेष म्हणजे गेल्या ८० वर्षांत कमी सामन्यांत बळींचे शतक पुर्ण करणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता. याआधी हा विक्रम माजी फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांच्या नावावर होता, ज्यांनी २० सामन्यांत १०० कसोटी बळी घेतले होते. (वृत्तसंस्था)