आर्यनची मुख्य फेरीत धडक
By Admin | Updated: April 27, 2015 23:31 IST2015-04-27T23:31:16+5:302015-04-27T23:31:16+5:30
मुंबईकर आर्यन गोवेस आणि पुण्याचा साहिल गवारे यांनी आपापल्या सामन्यात सहज विजय मिळवताना अखिल भारतीय पुरुष खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.

आर्यनची मुख्य फेरीत धडक
मुंबई: मुंबईकर आर्यन गोवेस आणि पुण्याचा साहिल गवारे यांनी आपापल्या सामन्यात सहज विजय मिळवताना अखिल भारतीय पुरुष खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.
खार जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईकर आर्यनला मुख्य फेरीत आगेकूच करण्यासाठी फारसे प्रयास करावे लागले नाहीत. उत्सर्ग ग्रोवर विरुद्धचा पहिला सेट सहजपणे ६-४ असा जिंकून आर्यनने आघाडी घेतली. यानंतर उत्सर्गने झुंजार खेळ करीत दुसऱ्या सेटमध्ये १-१ अशी बरोबरी साधली. परंतु याचवेळी त्याचा गुडघा दुखावला व त्याने सामन्यातून माघार घेतली. या वेळी पहिला सेट जिंकून आघाडीवर असलेल्या आर्यनला विजयी घोषित केले.
डेक्कनच्या साहिलनेदेखील एकतर्फी झालेल्या सामन्यात आक्रमक खेळ करताना वत्सीन ठक्करचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवत दिमाखात आगेकूच केली. त्याचवेळी कर्नाटकच्या विक्रम नायडूने अटीतटीच्या झालेल्या सामन्यात बाजी मारून मुख्य फेरीत प्रवेश केला. मिहिर अकोलकर विरुद्ध झालेल्या या सामन्यात टायब्रेकमध्ये गेलेला पहिला सेट चांगलाच रंगला. या वेळी विक्रमने ७-६(८-६) असा विजय मिळवून आघाडी घेतली. यानंतरच्या सेटमध्ये मात्र ६-२ असा खेळ करीत विक्रमने सफाईदार विजय मिळवला.
दुसऱ्या बाजूला ध्रुव सुनिश, शाहबाझ खान आणि सौरभ पाटील या महाराष्ट्राच्या त्रयीनेदेखील आपापल्या सामन्यात विजयाची नोंद करताना स्पर्धेच्या मुख्य फेरीत आपली जागा निश्चित केली. (क्रीडा
प्रतिनिधी)