अनुराग ठाकूर होणार बिगबॉस?

By Admin | Updated: May 19, 2016 05:19 IST2016-05-19T05:19:56+5:302016-05-19T05:19:56+5:30

शशांक मनोहर यांच्यानंतर कोण? अशी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.

Anurag Thakur to be Bigboss? | अनुराग ठाकूर होणार बिगबॉस?

अनुराग ठाकूर होणार बिगबॉस?

सचिन कोरडे,

पणजी- शशांक मनोहर यांच्यानंतर कोण? अशी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. मनोहर यांच्या राजीनाम्यानंतर बऱ्याच जणांची नावे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी आघाडीवर होती. मात्र, राज्य संघटनांचे ‘मतैक्य’ मिळविणाऱ्या अस्सल राजकारणी नेत्यालाच अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशचे खासदार अनुराग ठाकूर हेच बीसीसीआयचे नवे बिग बॉस होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या रविवारी (दि. २२) मुंबईत बीसीसीआयची बैठक होत आहे. या बैठकीत ठाकूर यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.ठाकूर यांच्यानंतर सचिवपदही रिक्त होईल. त्यामुळे त्यांच्या जागी अजय शिर्के यांचे नाव अधिक चर्चेत आहे.
अनुराग ठाकूर यांना पूर्व विभागातील सहाही संघटनांचा पाठिंबा आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी इतर संघटनांची ‘मने’ जिंकली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेच अध्यक्षपद असेल, असे गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव विनोद फडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. फडके म्हणाले, ‘जेव्हापासून ठाकूर यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली, तेव्हा त्यांनी विविध संघटनांमध्ये ‘आधुनिक’ बदल घडवून आणले. साधनसुविधा उभ्या करण्यास मदत केली. क्रिकेटच्या विकासासाठी ठाकूर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यामुळे गोव्यासह इतर राज्य संघटनाही त्यांच्याच बाजूने खंबीरपणे उभ्या आहेत. बीसीसीआयची मुंबईत विशेष सभा होत आहे. त्यांना २२ संघटनांचा पाठिंबा आहे. याच जोरावर ते बिनविरोध निवडले जातील,’ असा विश्वास फडके यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे, ठाकूर यांच्यानंतर सचिवपदी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अजय शिर्के यांचे नाव आघाडीवर आहे. आपण पदासाठी काम
करीत नसल्याचे शिर्के यांनी स्पष्ट केले होते. मात्र, शिर्के यांना या पदासाठी अधिक दावेदार मानले जात
आहे. श्रीनिवासन यांची स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून २०१३ पासून खजिनदार म्हणून शिर्के यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. ठाकूर यांना बंगालसह झारखंड, ओडिशा, कोलकाता, आसाम आणि त्रिपुरा संघटनांचा भक्कम पाठिंबा आहे.
>निवडणुकीला सुप्रीम कोर्टात आव्हान
नवी दिल्ली : येत्या २२ मे रोजी होणाऱ्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या निवडणुकीला क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारने(सीएबी) बुधवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
ज्यांच्यावर आरोपपत्र दाखल आहेत त्यांना निवडणुकीतील सहभागापासून रोखणे तसेच पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीस स्थगिती देण्याची विनंती सीएबीने याचिकेत केली. न्या. ए. एम. सप्रे आणि न्या. अशोक भूषण या सुटीकालीन पीठापुढे ही याचिका दाखल करण्यात आली.
पण या प्रकरणी आधीच पूर्णकालीन पीठापुढे सुनावणी सुरू असल्याने आम्ही यावर विचार करण्यास असमर्थ असल्याचे सांगून सुनावणीस नकार दिला. तसेच, सीएबीच्या वकीलाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणीही यावेळी केली.

Web Title: Anurag Thakur to be Bigboss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.