ता रे आ स मा न प र

By Admin | Updated: May 27, 2014 06:15 IST2014-05-27T06:15:24+5:302014-05-27T06:15:24+5:30

अशक्यप्राय आव्हान अ‍ॅँडरसन आणि अंबाती रायडू यांनी आवाक्यात आणलेले. मात्र, शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव पूर्ण करताना रायडू धावबाद झाला

The answer is yes | ता रे आ स मा न प र

ता रे आ स मा न प र

शिवाजी गोरे, पुणे - अशक्यप्राय आव्हान अ‍ॅँडरसन आणि अंबाती रायडू यांनी आवाक्यात आणलेले. मात्र, शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव पूर्ण करताना रायडू धावबाद झाला. त्यातही दुसरा धक्का म्हणजे उत्तुंग फटकेबाजी करणारा अ‍ॅँडरसन स्ट्राईकवर नव्हता आणि आता किमान चौकार खेचून मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याची जबाबदारी नवोदित आदित्य तारेवर आलेली. राजस्थान रॉयल्सने अगोदरच जल्लोष सुरू केल्याने मनात निर्माण झालेली धास्ती आणि ंमुंबई इंडियन्सच्या हजारो पाठीराख्यांच्या अपेक्षांचे ओझे आदित्यवर होते. मात्र, ते सगळे झुगारून देऊन आदित्यने षटकार ठोकला आणि मुंबईचे तारे आसमानवर असल्याचे दाखवून दिले. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. मैदानावर सामन्याचा निकाल केव्हाही बदलू शकतो, याचा अनुभव रविवारी प्रेक्षकांना आला. शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावलेल्या राजस्थानविरुध्दच्या लढतीत तारेने फॉल्कनरला षटकार ठोकून आपल्या संघाचे क्लालिफायरमध्ये स्थान निश्चित केले. डोळ्यांचे पारणे फेडायला लावणार्‍या या अफलातून एका षटकाराने आदित्य तारेला हीरो केले. आदित्य क्रिकेटबरोबर फुटबॉल खेळाडूही, त्यामुळे फुटबॉलमधला जोश आणि किलिंग इस्टिंक्ट त्याच्यात ठासून भरलेले आहे, त्यामुळेच राजस्थान रॉयल्सने त्याला गांभीर्याने घेतले नाही, ही त्यांची चूक ठरली. मुंबईच्या या ‘बेस्ट रणजीपटू’ने संघाने त्याच्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी लीलया पार पाडली. राजस्थानविरुध्द महत्त्वपूर्ण लढतीत मुंबई संघाला १४.३ षटकांत १८९ दावांचे आव्हान पूर्ण करायचे होते. सामन्याच्या शेवटच्या षटकात अंबाती रायडू धावबाद झाला आणि मुंबई संघाच्या क्लालिफायरमध्ये पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असेच सर्वांना वाटले. रायडूनंतर मुंबईचा आदित्य तारे मैदानावर फलंदाजीला आला. समोर गोलंदाज जेम्स फॉल्कनर होता, तेव्हा मुंबई संघाला नेटरनरेटने क्लालिफाय होण्यासाठी एका चेंडूत चौकार मारणे अनिवार्य हाते. अन्यथा गतविजेत्या मुंबईला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले असते. अ‍ँडरसन एक बाजू लढवत असताना दुसर्‍या बाजूने सातव्या क्रमांकावर मुंबईचा आदित्य तारे मैदानावर फलंदाजीस आला, तेव्हा मुंबईकरांना व घरी बसून टीव्हीवर लढत पाहत असलेल्या लाखो मुंबईकरांचा श्वास रोखला होता. काही जण डोळे मिटून हात जोडून बसले होते तर काही जण हात जोडून आकाशाकडे पाहत होते. फॉल्कनर गोलंदाजी करायला पळत असताना संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली होती. खेळपट्टीवर असलेल्या आदित्यसह सर्वांच्या छातीत धडधडत होते. फॉल्कनरने चेंडू आदित्यच्या डाव्या पायाजवळ थोडा फुल टॉस टाकला आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तोच आदित्यने बॅट फिरवून चेंडूला आकाशाच्या दिशेने टोलविले आणि संपूर्ण स्टेडियम शिट्ट्या आणि जल्लोषाने दणाणून गेले. मुंबई संघाला विजयासाठी जो नेटरनरेट हवा होता, त्यासाठी आवश्यक असलेल्या चार धावा या षटकारामुळे पूर्ण झाल्या होत्या. मुंबई संघातील खेळाडूंनी मैदानावर धाव घेतली आणि आदित्यला उचलून घेत आनंदोत्सव साजरा केला.

Web Title: The answer is yes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.