अंकित चव्हाणला ‘रेड सिग्नल’
By Admin | Updated: August 2, 2015 23:32 IST2015-08-02T23:32:37+5:302015-08-02T23:32:37+5:30
दिल्लीतील एका न्यायालयाने पुराव्यांअभावी आयपीएल स्पॉट फिक्सिंगमधून निर्दोष मुक्तता केलेल्या मुंबईकर अंकित चव्हाण याच्यावरील बंदी कायम

अंकित चव्हाणला ‘रेड सिग्नल’
मुंबई : दिल्लीतील एका न्यायालयाने पुराव्यांअभावी आयपीएल स्पॉट फिक्सिंगमधून निर्दोष मुक्तता केलेल्या मुंबईकर अंकित चव्हाण याच्यावरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) घेतला आहे. तसेच २०१२ साली आयपीएल सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर घातलेल्या धिंगाणाप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याच्यावरील वानखेडे स्टेडियम प्रवेश बंदी मात्र मागे घेण्याचा निर्णय एमसीएने घेतला आहे.
रविवारी सकाळी झालेल्या एमसीएच्या बैठकीमध्ये उपाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये हे दोन्ही निर्णय घेण्यात आले. काहीदिवसांपुर्वीच दिल्लीतील न्यायालयाने अंकितसह, श्रीसंत आणि अजित चंडीला या तिघांची स्पॉट फिक्सिंगमधून निर्दोष मुक्तता केली. यामुळे या तिघांवरही लादण्यात आलेली आजन्म क्रिकेट बंदी रद्द होणार का यावर सर्वांचे लक्ष लागले होते. बीसीसीआयने हा निर्णय कायम ठेवण्याचे स्पष्ट केल्यानंतर एमसीएने देखील मुंबईच्या अंकित चव्हाणची बंदी कायम ठेवण्यात येईल असे रविवारी झालेल्या बैठकीतून स्पष्ट केले.
याबाबतीत शेलार यांनी एमसीएची बाजू मांडताना सांगितले की, ‘बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी संहिताअंतर्गत दोषी ठरलेल्या खेळाडूचे एमसीए कोणत्याही स्वरुपात समर्थन करणार नाही. बीसीसीआयने आपल्यावर लादलेली बंदी रद्द करावी यासाठी एमसीएला पुढाकार घेण्याची विनंती केली होती. मात्र याआधीच बीसीसीआयने ईमेलद्वारे याविषयी एमसीएला आपली भूमिका स्पष्ट केली आहे.’
अंकितवरील बंदी कायम ठेवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविषयी अधिक सांगताना शेलार म्हणाले की, ‘बीसीसीआयने अंकित विषयी दिलेल्या निर्णयाला एमसीएने आव्हान न देण्याचे ठरवले आहे. यासाठीच आम्ही अंकितने केलेली विनंती मान्य केली नाही. न्यायालयाने दिलेला आदेश केवळ मोक्कावर आधारीत असल्याने अंकितवरील कारवाई कायम ठेवण्याचा निर्णय सर्व सभासदांच्या मान्यतेने बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे त्याने बीसीसीआयच्या निर्णयाला आव्हान दिलेले नसताना एमसीए कशाप्रकारे निर्णय घेऊ शकेल?’, असेही शेलार म्हणाले. (क्रीडा प्रतिनिधी)