अनिल कुंबळेचा 'मुंबई इंडियन्स'ला गुड बाय..
By Admin | Updated: November 30, 2015 20:49 IST2015-11-30T20:45:25+5:302015-11-30T20:49:40+5:30
भारताचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने मुंबई इंडियन्सच्या मुख्य सल्लागार पदाचा राजीनामा देऊन गुड बाय केले आहे. क्रिकेट व्यवस्थापनाशी संबंधित इतर क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी हा निर्णय घेतला

अनिल कुंबळेचा 'मुंबई इंडियन्स'ला गुड बाय..
ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. ३० - भारताचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने मुंबई इंडियन्सच्या मुख्य सल्लागार पदाचा राजीनामा देऊन गुड बाय केले आहे. क्रिकेट व्यवस्थापनाशी संबंधित इतर क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी हा निर्णय घेतला, असे कुंबळे यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद केले आहे. जानेवारी २०१३ पासून कुंबळे ‘मुंबई इंडियन्स‘चा मुख्य मार्गदर्शक म्हणून काम पाहत होता.
'जंबो'च्या कारकिर्दीमध्ये मुंबईच्या संघाने २०१३ आणि २०१५ मध्ये ‘आयपीएल‘मध्ये विजेतेपद पटकाविले. तर २०१३ मध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धेमध्येही मुंबईचा संघ विजयी झाला होता.
‘सातत्यपूर्ण कामगिरी करणारा दर्जेदार खेळाडूंचा संघ बांधल्याचे समाधान आहे आणि याच समाधानासह मी हे काम थांबवित आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये ‘मुंबई इंडियन्स‘ने घवघवीत यश मिळविले. दोन वेळा ‘आयपीएल‘चे अजिंक्यपद आणि एकदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद ही कामगिरी सुखावह होती. एकाच वर्षांत दोन्ही स्पर्धा जिंकणे हा या यशाचा कळस होता. क्रिकेटच्या इतर क्षेत्रांमधील संधी पाहण्याचा मी प्रयत्न करत आहे,‘ असे कुंबळे यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.