टेनिस संघटनेच्या मान्यतेसाठी अनिल खन्ना यांची माघार

By Admin | Updated: November 4, 2016 04:14 IST2016-11-04T04:14:18+5:302016-11-04T04:14:18+5:30

अनिल खन्ना यांनी गुरुवारी अखिल भारतीय टेनिस असोसिशएनच्या (एआयटीए) अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Anil Khanna's retreat for tennis association's approval | टेनिस संघटनेच्या मान्यतेसाठी अनिल खन्ना यांची माघार

टेनिस संघटनेच्या मान्यतेसाठी अनिल खन्ना यांची माघार


नवी दिल्ली : अनुभवी क्रीडा प्रशासक अनिल खन्ना यांनी गुरुवारी अखिल भारतीय टेनिस असोसिशएनच्या (एआयटीए) अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सरकारसोबत वितुष्ट ओढवून घेतल्यामुळे खेळाचे नुकसान होईल तसेच टेनिस संघटनेला मान्यता मिळणार नाही, असे खन्ना यांनी म्हटले आहे.
इंदूर येथे ३ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या एआयटीएच्या आमसभेत दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडण्यात आले होते. पुढील चार वर्षांसाठी त्यांची ही नियुक्ती होती; पण सरकारच्या क्रीडासंहितेनुसार दोन कार्यकाळांत किमान ‘चार वर्षांची विश्रांती’ या नियमांचा हवाला देत, त्यांनी नियम स्पष्ट होईपर्यंत पद स्वीकारण्यास नकार दिला होता. तथापि, ते एआयटीएचे आजीवन अध्यक्ष बनले होते.
याआधी सलग दोनदा महासचिव राहिलेले खन्ना हे एआयटीएचे २०१२मध्ये अध्यक्ष बनताच क्रीडा मंत्रालय आणि एआयटीए यांच्यात बेबनाव सुरू झाला होता. सरकारचे मत असे, की अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी खन्ना यांनी मधली ४ वर्षे विश्रांती (कूलिंग आॅफ) घेतली नाही; पण एआयटीएचा युक्तिवाद असा, की खन्ना यांनी महासचिव म्हणून दुसऱ्यांदा निवडणूक लढविली नव्हती, शिवाय महासचिव राहिलेली व्यक्ती कूलिंग आॅफशिवाय अध्यक्ष बनू शकत नसल्याचा कुठलाही नियम अस्तित्वात नाही. मंत्रालय मात्र स्वत:च्या तर्कावर कायम आहे. याचा परिणाम म्हणून अलीकडे एआयटीएची मान्यता रद्द करण्यात आली.
खन्ना हे आयटीएफचेदेखील उपाध्यक्ष आहेत. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, ‘‘मी टेनिसचे नुकसान होण्यापेक्षा पदमुक्त होऊ इच्छितो. एआयटीएच्या नियमानुसार नव्याने अध्यक्षाची निवड करण्याची कार्यकारिणीला विनंती करीत आहे. मागच्या वर्षीदेखील तुम्ही असाच निर्णय घेतला होता; पण एआयटीएच्या कार्यकारिणीने पदावरून माघारीची परवानगी दिली नव्हती, असे विचारताच ते म्हणाले, ‘‘या वेळी मी आपल्या निर्णयावर ठाम असेन. खन्ना हे भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे कोशध्यक्ष आहेत.’’
हा निर्णय दडपणाखाली घेतला काय, असे विचारताच खन्ना म्हणाले, ‘‘मी कुणाच्याही दडपणात नाही. एआयटीएने सरकारसोबत काम करावे, ही माझी इच्छा असल्याने हा निर्णय घेतला.’’ (वृत्तसंस्था)
>या वेळी मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. सर्व २३ राज्य संघटनांना विनंतीपत्र लिहिणार आहे. टेनिस संघटनेचे नाव बदनाम होऊ नये, यासाठी मी माघार घेत आहे. सरकारसोबत भांडण विकत घेण्याची आमची मानसिकता नाही. अध्यक्ष आणि सचिव देशात नसतानादेखील टेनिस संघटनेचे कामकाज थांबत नाही. मी योग्य वेळी सल्ला देण्यास तयार आहे.
- अनिल खन्ना,
अध्यक्ष एआयटीए

Web Title: Anil Khanna's retreat for tennis association's approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.