...आणि सचिनने सौरव गांगुलीची झोप उडवली
By Admin | Updated: August 8, 2016 12:54 IST2016-08-08T12:54:12+5:302016-08-08T12:54:12+5:30
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने अनेक वर्ष एकत्र भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. दोघांनी मिळून अनेक विक्रमही रचले.

...आणि सचिनने सौरव गांगुलीची झोप उडवली
ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. ८ - सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने अनेक वर्ष एकत्र भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. दोघांनी मिळून अनेक विक्रमही रचले. पण फार कमी जणांना माहित असेल सचिन आणि सौरवची पहिली भेट मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये झाली होती.
सचिन बरोबर झालेली पहिली भेट सौरव कधीच विसरला नाही. कारण त्या भेटीत सचिनमुळे सौरवची रात्रीची झोप उडाली होती. बीसीसीआयने त्यावेळी इंदूरमध्ये अंडर १४ चे शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी दोघांची पहिली ओळख झाली. सचिन आणि सौरव दोघे रुममेट होते.
एका रात्री सचिन उठला संपूर्ण रुममध्ये फिरला आणि पुन्हा आपल्या बिछान्यात येऊन झोपला. सचिन बाथरुमला गेला असेल असे त्यावेळी सौरवला वाटले. पण पुन्हा दुस-या रात्री तसेच घडले. त्यावेळी सौरवने सचिनला विचारले. त्यावर सचिनने आपल्याला रात्री झोपेत चालण्याची सवय असल्याचे सांगितले. सचिनच्या त्या उत्तराचा गांगुलीने चांगलाच धसका घेतला त्यानंतर शिबिर संपेपर्यंत प्रत्येक रात्री सौरवचे सचिनवर लक्ष असायचे.