...आणि कोहलीचा तोल सुटला
By Admin | Updated: March 3, 2015 23:40 IST2015-03-03T23:40:04+5:302015-03-03T23:40:04+5:30
भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहलीचा मंगळवारी तोल सुटला.

...आणि कोहलीचा तोल सुटला
पर्थ : भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहलीचा मंगळवारी तोल सुटला. सरावसत्र आटोपून आल्यानंतर समोर दिसलेल्या एका पत्रकाराला पाहून त्याने थेट शिवराळ भाषा वापरण्यास सुरुवात केली. संघातील इतर सदस्यांसह संबंधित पत्रकारदेखील अचानक झालेल्या या शाब्दिक हल्ल्याने बुचकळ््यात पडला. त्याच्या या वर्तनाबाबत संघाचे संचालक रवी शास्त्री यांनीदेखील त्याची कान उघाडणी केली आहे.
वेस्ट इंडीज संघाबरोबर होत असलेल्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे सरावस सत्र होते. सरावसत्र आटोपून कोहली ड्रेसिंग रुम कडे जात होता. त्यावेळी समोरच एका राष्ट्रीय दैनिकाचा पत्रकार उभा होता. त्याला पाहताच कोहली महाशयांचे माथे भडकले. त्याने थेट पत्रकाराला शिवराळ भाषा वापरण्यास सुरुवात केली. काही वेळ हा प्रकार सुरु होता. कोहलीचा हा रुद्रावतार पाहून त्याचे संघ सहकारीदेखील अचंबित झाले. संबंधित पत्रकाराला देखील नक्की आपली चूक काय झाली, ते समजले नाही.
मात्र काही वेळानंतर कोहली शांत झाल्यानंतर त्याच्या भडकण्याचा उलगडा झाला. कोहलीची मैत्रीण अनुष्का शर्मा हिच्याविषयी एका राष्ट्रीय दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरुन कोहली नाराज होता. संबंधित पत्रकारानेच ते वृत्त प्रसिद्ध केल्याचा त्याचा समज झाला. मात्र त्याची ती चूक होती असे त्याच्या लक्षात आले. तेव्हा ओशाळलेल्या कोहलीने अन्य एका पत्रकाराला बोलावून माफी मागितली. (वृत्तसंस्था)