आमलाचा ‘जलवा’
By Admin | Updated: July 7, 2014 05:13 IST2014-07-07T05:13:11+5:302014-07-07T05:13:11+5:30
सलामीवीर फलंदाज हाशिम आमलाच्या (१०९) शानदार शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डेत ७५ धावांनी विजय मिळविला़

आमलाचा ‘जलवा’
कोलंबो : सलामीवीर फलंदाज हाशिम आमलाच्या (१०९) शानदार शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डेत ७५ धावांनी विजय मिळविला़ या विजयासह आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली आहे़
दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ५ बाद ३०४ धावा केल्या़ त्यानंतर गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर श्रीलंकेचा डाव ४०़३ षटकांत २२९ धावांत संपुष्टात आणताना सामन्यात बाजी मारली़
आमलाने १३० चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि १ षट्कार लगावला़ वन-डेतील आमलाचे हे १३वे शतक ठरले़ आमलाने एबी डिव्हिलियर्स (७५) सोबत तिसऱ्या गड्यासाठी १५१ धावांची उपयोगी भागीदारी करताना संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली़ डिव्हिलियर्सने ७० चेंडंूत ७५ धावांची खेळी केली़ या खेळीत ५ चौकारांचा समावेश होता़
आफ्रिकेकडून क्विटन डि कॉक याने २७ धावांचे योगदान दिले़ जे़ पी़ ड्युमिनी १६ धावा काढून तंबूत परतला, तर डेव्हिड मिलर याने २१ चेंडूंत २ चौकार आणि २ षट्कारांसह नाबाद ३६ आणि रियान मॅक्लारेन याने १८ चेंडूंत २ चौकारांसह नाबाद २२ धावांची खेळी केली़ लंकेकडून अजंथा मेंडिस याने ६१ धावांत ३ गडी बाद केले़ अँजेलो मॅथ्यूज आणि सचित्रा सेनानायके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला़
आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली़ त्यांचे सलामीवीर फलंदाज कुशल परेरा (३४) आणि तिलकरत्ने दिलशान (४०) यांनी पहिल्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी केली़ संगकारा मैदानात उतरल्यानंतर अँकरची भूमिका निभावली़ त्याने दिलशानसोबत दुसऱ्या गड्यासाठी ४८ धावा जोडल्या;मात्र यानंतर लंकेचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले़