क्रिकेटपटू अमित मिश्राविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
By Admin | Updated: October 21, 2015 04:31 IST2015-10-21T04:31:26+5:302015-10-21T04:31:26+5:30
भारतीय संघातील लेगस्पिनर अमित मिश्राच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेंगळरू पोलिसांनी त्याला आठवडाभरात चौकशीसाठी हजर राहण्याची

क्रिकेटपटू अमित मिश्राविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
बेंगळुरू : भारतीय संघातील लेगस्पिनर अमित मिश्राच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेंगळरू पोलिसांनी त्याला आठवडाभरात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी मिश्राची निवड करण्यात आली आहे.
मिश्रा आणि तक्रारदार मुलीची चार ते पाच वर्षांपासून ओळख आहे आणि ते सातत्याने भेटतही होते. गेल्या महिन्यात मिश्रा येथे क्रिकेट कॅम्पसाठी आला तेव्हा ही मैत्रिण त्याला भेटायला येथील एका हॉटेलमध्ये गेली होती. ती त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा तो उपस्थित नव्हता. तो परत आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी मिश्राने आपला विनयभंग केल्याची तक्रार तिने केली आहे.
याबाबत मध्य विभागाचे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मिश्राला नोटीस बाजवून गेल्या चौकशीसाठी पाचारण केले आहे. तसेच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदविले असून, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही मिळविले आहेत.
महिलेच्या तक्रारीवरून मिश्राविरुद्ध भांदविच्या ३५४ आणि ३२८ कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच याबाबत बीसीसीआयला देखील माहिती देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)