अमेय जोशीची दमदार आगेकूच
By Admin | Updated: June 29, 2016 19:55 IST2016-06-29T19:55:02+5:302016-06-29T19:55:02+5:30
मुंबईकर अमेय जोशीने ठाण्याच्या सिद्धेश हुडेकरचा सरळ दोन गेममध्ये पराभव करत पहिल्या महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेत आगेकूच केली

अमेय जोशीची दमदार आगेकूच
महाराष्ट्र बॅडमिंटन : मुंबईकर विकीची देखील चमक
मुंबई : मुंबईकर अमेय जोशीने ठाण्याच्या सिद्धेश हुडेकरचा सरळ दोन गेममध्ये पराभव करत पहिल्या महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेत आगेकूच केली. दुसऱ्या बाजूला मुंबईच्याच विकी लापसियाने रत्नागिरीच्या सुधांशू चर्तुवेदीला ३-१ असे नमवले.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने स्पोटर््स युनायटेडच्या वतीने चेंबुर जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अमेयने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना सिध्देशला दबावाखाली ठेवले. पहिल्या गेममध्ये सिद्धेशने काहीअंशी प्रतिकार केला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये अमेयच्या धडाक्यापुढे सिद्धेशचा निभाव लागला नाही. एकहाती वर्चस राखताना अमेयने १५-११, १५-०९ अशी सहज बाजी मारली.
दुसऱ्या बाजूला अटीतटीच्या झालेल्या लढतीत विकीने रत्नागिरीच्या सुधांशूचा २-१ असा पाडाव केला केला. पहिल्या गेममध्ये (१५-१३) २ गुणांच्या फरकाने बाजी मारत विकीने आघाडी घेतली. यानंतर सुधांशूने जबरदसत पुनरागमन करताना दुसऱ्या गेमसह सामना बरोबरीत आणला. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये पुन्हा एकदा चुरशीचा खेळ झाला. मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना विकीने १५-१३, १४-१५, १५-१४ असा रोमहर्षक विजय मिळवला. अन्य सामन्यात मुंबईच्या संकेत शिरभाटेने नाशिकच्या सौरभ अल्पेवर १५-११, १५-१३ असा विजय मिळवला.
नागपूरच्या वरद गजभीये यानेही विजयी कूच करताना अमरावतीच्या आशिष चौहानचे कडवे आव्हान १५-५, १०-१५, १५-१२ असे परतावले. तसेच पुण्याच्या अमेय ओकने दणदणीत विजय मिळवताना अमरावतीच्याच निखिल पांडेला १५-७, १५-९ असा धक्का दिला. तर ठाण्याच्या प्रसन्नजित शिरोडकरने मुंबईच्या विराज दुवेदीचा १५-०५, १५-११ असा धुव्वा उडवला. (क्रीडा प्रतिनिधी)
.................................
इतर निकाल :
अमेय जोशी (मुंबई) वि.वि. सिध्देश हुडेकर (ठाणे) १५-११, १५-९; विनीत कांबळे (पुणे) वि.वि. कुणाल दसरवार (नागपूर) १५-५, १५-९; सुदर्शन सौरोट (पुणे) वि.वि. दिपेश पाटील (जळगाव) १५-६, १५-१४; संकेत शिरभाटे (मुंबई) वि.वि. सौरभ अल्पे (नाशिक) १५-११, १५-१३.
....................................