अद्भुत... अकल्पनीय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 12:04 IST2024-12-15T12:03:43+5:302024-12-15T12:04:30+5:30

डोम्माराजू गुकेशच्या विजयाची तुलना ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर धावण्याची स्पर्धा कोणी ८ सेकंदांत पूर्ण केली, अशा विक्रमासोबत करता येईल. बाकीच्यांना शर्यत पूर्ण करण्यासाठी ९.५ सेकंद लागतात. त्यामुळे गुकेशचा पराक्रम हा अद्भुत, अकल्पनीय आहे. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

amazing unbelievable success of d gukesh in chess | अद्भुत... अकल्पनीय...

अद्भुत... अकल्पनीय...

प्रवीण ठिपसे, ग्रॅण्डमास्टर 

सिंगापूर येथे झालेल्या वैयक्तिक विश्वविजेतेपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा चेन्नईचा डोम्माराजू गुकेश हा विजयी ठरला आहे. त्याने चीनच्या डिंग लिरेन याचा पराभव केला. यापूर्वी वैयक्तिक जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद विश्वनाथन आनंद हे एकमेव भारतीय खेळाडू होते. रॅपिडमध्ये महिलांमध्ये हा पराक्रम कोनेरू हम्पी यांनी केलेला आहे. गुकेशच्या पराक्रमाचा विचार केल्यास, जागतिक विजेतेपद मिळविणारे दुसरे भारतीय, असा उल्लेख करून चालणार नाही. यापूर्वी सर्वांत कमी वयात वैयक्तिक विजेतेपदासाठीचा विक्रम लेजेंडरी गॅरी कास्पारोव्ह यांच्या नावाने होता. ते २२ वर्षे ८ महिन्यांचे असताना जगज्जेते झाले होते. हा विक्रम सुमारे ३९ वर्षे अबाधित होता. विश्वनाथन आनंद किंवा मॅग्नस कार्ल्सन यांनाही तो मोडता आला नाही. गुकेश याने हा विक्रम मोडला तर आहेच, पण ४ वर्षे आणि २ महिन्यांच्या अंतराने विक्रम मोडला आहे. विश्वनाथन आनंद हे जेव्हा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते ठरले, त्यावेळी भारतात एक बुद्धिबळाची लाट आली होती. २०००च्या दशकात शशिकिरण, गांगुली, हरिकृष्ण, आदींनी २६चे रेटिंग पार केले. परंतु, सर्व खेळाडू हे २०-२५ जागतिक रैंकिंगच्या आत येऊन थांबले होते.

ऑलिम्पियाडमध्येही २०१४ चा अपवाद वगळता आपल्याला कधीही पदक मिळाले नव्हते. २०२२चे ऑलिम्पियाड भारतात झाले. कुठलाही प्रायोजक नसताना यजमानपद घेतले होते. मात्र, यामुळे भारतातील तरुण खेळाडूंना चांगली संधी मिळाली. त्यावेळी भारताला एकापेक्षा जास्त संघ खेळविता आले. मॅग्नस कार्ल्सन यांनी त्यावेळी भारताचा संघात प्रज्ञानानंद आणि गुकेश यासाख्या खेळाडुंचा 'ब' संघ पाहून तत्काळ प्रतिक्रिया दिली, की भारताचा 'ब' संघ हा 'अ' संघापेक्षा सरस आहे. तसेच झाले. पदक 'ब' संघाला मिळाले. त्यावेळी १६ वर्षांच्या गुकेशला पहिल्या पटावर सुवर्णपदक मिळाले आणि कार्ल्सनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आपण जगज्जेते होण्याचा प्रयत्न का करत नाही ? ही विचारधारा २०२२च्या ऑलिम्पियाडपासून सुरू झाली. त्यानंतर भारतीय खेळाडुंनी कार्ल्सन, डिंग लिरेन यासाख्या खेळाडूंना हरवायचे आहे, हा ध्यास धरला. आज भारताचा आव्हानवीर जगज्जेता बनला आहे.

कार्पोरेट क्षेत्राने पुढाकार घेण्याची गरज

भारतातील अंडर-१५ मधील १०० व इतर गटातील ३०० मुलामुलींना ग्रँडमास्टर्सकडून मोफत प्रशिक्षण मिळायला हवे. एक प्रस्ताव देण्यात आला आहे की, खासगी प्रायोजक आणून सुमारे ४०० खेळाडूंना मोफत प्रशिक्षण द्यावे, जेणेकरून सातत्याने चांगली परिस्थिती राहू शकते, जशी रशियामध्ये होती. अन्यथा एक भीती आहे की, गुकेश किंवा प्रज्ञानानंद यासारखे खेळाडू गेले आणि त्यानंतर कोणीच या तोडीचा खेळाडू तयार झाला नाही. यासाठी कार्पोरेट सेक्टरने प्रशिक्षणासाठी निधी दिला पाहिजे. अनेक गरीब किंवा मध्यम वर्गातील प्रतिभावंत खेळाडू एका टप्प्यात थांबतात. हे रोखण्यासाठी प्रशिक्षणाची सोय केली पाहिजे.

प्रशिक्षणावर होतो प्रचंड खर्च 

बरेच खेळाडू ग्रँडमास्टर होईपर्यंत सुमारे ४० ते ५० लाख रुपयांपर्यंत प्रशिक्षण आणि स्पर्धा खेळण्यावर खर्च करतात. त्यामुळे श्रीमंत वर्गातील खेळाडूच खेळू शकतात. आपल्याकडे आज ३६ हजार खेळाडूच नोंदणीकृत आहेत, जे स्पर्धामध्ये भाग घेतात. ऑनलाइनमध्ये हा आकडा ६ ते ७ कोटींवर आहे.  मात्र, ऑनलाइन खेळाडू काही जगज्जेते होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष स्पर्धा खेळणारे ३६ हजार एवढेच आहेत. त्यात महिलांचे प्रमाण केवळ ८ टक्के आहे. या परिस्थितीत भविष्य कसे आहे, याकडे पाहिले पाहिजे. पण, कुठेतरी प्रशिक्षणाची व्यवस्था निर्माण व्हायला हवी.

'यूएसएसआर'चा पॅटर्न राबविण्याची गरज

सुमारे ५० वर्षे बुद्धिबळात 'यूएसएसआर'चे वर्चस्व होते. तसे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला प्रशिक्षणाची एक यंत्रणा उभारावी लागेल. प्रतिभावंत ३००-४०० खेळाडूंना प्रशिक्षित करता येईल. तरच भारत बुद्धिबळाचा सुपर पॉवर होईल. २०१८ मधील चीनसारखे होईल. २०१८मध्ये चीन सुपर पॉवर होता. महिला विजेतेपद, ऑलिम्पियाडमध्ये महिला व पुरुष गटाचे जेतेपद चीनकडे होते. गेल्या वर्षी डिंग लिरेन चॅम्पियन झाला. त्यावेळी चारही जेतेपद आमच्याकडे होते, अशा अभिमान चीनने दाखविला. परंतु, २०१८मध्ये शासकीय मदत थांबली. आज त्यांच्याकडे केवळ एकच महिला विजेतेपद राहिले आहे. तेदेखील कधीपर्यंत राहील, हे सांगता येत नाही. चीनने केलेला पराक्रम आपल्याला साध्य करायचा आहे. पण, आपल्याला यूएसएसआरसारखे सातत्य राखायचे आहे. यूएसएसआरसारखी पद्धत आपण कार्पोरेट सेक्टरकडून वापरायला हवी. नाहीतर अनेक प्रतिभाशाली खेळाडू खेळ सोडून देतील. आताचे खेळाडू पुढे ८-१० वर्षांनंतर जेव्हा खेळ सोडतील, तेव्हा त्यांची जागा घ्यायला कोणी खेळाडू नसेल.
 

Web Title: amazing unbelievable success of d gukesh in chess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.