लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सलामीवीर अमन खानच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर बांद्रा हीरोज संघाने मुंबई टी२० लीग क्रिकेट स्पर्धेतील चौथा विजय मिळवताना शिवाजी पार्क वॉरियर्सने दिलेल्या भल्यामोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. प्रथम फलंदाजी करताना शिवाजी पार्कने ५ बाद २१६ धावांची मजबूत मजल मारली. परंतु, अमनने तुफानी सुरुवात करून दिल्यानंतर बांद्राने १७.१ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले.पोलीस जिमखाना मैदानावर झालेल्या या सामन्यात भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अमनने शिवाजी पार्क संघाचा खरपूस समाचार घेतला. त्याने ५ चौकार व ६ षटकारांचा पाऊस पाडताना दमदार ६२ धावांचा तडाखा दिला. अमनमुळे आवश्यक धावगती आवाक्यात आल्यानंतर शाम्स मुलानी (२५), खिझार दाफेदार (२८) आणि शोएब सिद्दिकी (नाबाद ४८) यांनी संघाला शानदार विजय मिळवून दिला. दखल घेण्याची बाब म्हणजे ध्रुमील मटकरने (५/३५) अर्धा संघ बाद केल्यानंतरही शिवाजी पार्क संघाला पराभव पत्करावा लागला.
अमनच्या जोरावर बांद्रा हीरोजचा चौथा विजय
By admin | Updated: May 6, 2017 03:03 IST