नेहमी जबाबदारीचे भान ठेवतो : कोहली
By Admin | Updated: August 2, 2015 01:30 IST2015-08-02T01:30:17+5:302015-08-02T01:30:17+5:30
गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सर्वश्रेष्ठ फॉर्ममध्ये दिसत नाही. पण, नेहमी जबाबदारीचे भान ठेवून संघासाठी खेळत असल्याने अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण

नेहमी जबाबदारीचे भान ठेवतो : कोहली
चेन्नई : गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सर्वश्रेष्ठ फॉर्ममध्ये दिसत नाही. पण, नेहमी जबाबदारीचे भान ठेवून संघासाठी खेळत असल्याने अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण कसोटी कर्णधार असलेल्या कोहलीने दिले आहे. आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध शनिवारी संपलेल्या चार दिवसांच्या अनधिकृत सामन्यात विराटने १६ आणि ४५ धावांचे योगदान दिले. यजमान संघाला या सामन्यात १० गड्यांनी पराभव पत्करावा लागला. भारताने यंदा खूप कसोटी सामने खेळले नाहीत. वन-डेतही कोहलीच्या कामगिरीत चढ-उतार पाहायला मिळाले. त्याने वन-डेत फेब्रुवारीपासून एकही शतक ठोकलेले नाही. १२ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या लंका दौऱ्यात सूर गवसावा यासाठी आक्रमकतेवर संयम राखावा लागेल का, असा सवाल करताच कोहलीने स्पष्टपणे नकार दिला. तो म्हणाला, ‘‘फलंदाज म्हणून नेहमी जबाबदारीने खेळतो. खेळताना संघाचा विजय कसा होईल, याचा विचार मनात असतो. धावा काढण्यासाठी आक्रमकतेत बदल करण्याची गरज असल्याचे मला वाटत नाही. क्रिकेट खेळताना फलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण, माझे काम १०० टक्के योगदान देणे हेच आहे. संपूर्ण जबाबदारीचे भान ठेवून खेळत असल्याने कुठलाही बदल न करता यापुढेही आक्रमक खेळत राहीन.’’ लंका दौऱ्यात भारताला तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. यावर कोहली म्हणाला, ‘‘प्रथमच संपूर्ण दौऱ्यात भारताचे नेतृत्व करण्यास मी उत्साही आहे.’’ भारत ‘अ’ संघात कोहली राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये खेळला. याचा फार लाभ झाल्याचे कोहलीने सांगितले. राहुल द्रविडसारख्या महान खेळाडूच्या मार्गदर्शनात खेळण्याचा शांतप्रिय अनुभव मी घेतला आहे. राहुलला पाहिल्यानंतरच तुम्हाला बरेच काही शिकायला मिळते, असे कोहलीचे मत होते. या सामन्यात खेळण्याच्या निर्णयासंदर्भात तो म्हणाला, ‘‘लंका दौऱ्याआधी सूर गवसावा, अशी यामागे भावना होती. त्याआधी तीन आठवडे बऱ्यापैकी विश्रांतीदेखील मिळाली आहे. आता लंका दौऱ्यासाठी सर्वोत्कृष्ट तयारी करू.’’ संघातील सहकाऱ्यांबाबत तो म्हणाला, ‘‘मुरली विजय, अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग आणि रविचंद्रन अश्विन हे सामना फिरविण्यात मोलाची मदत करू शकतात. विजय दणकेबाज सुरुवात करून देऊ शकतो. मानसिकरीत्या तो चांगला खेळाडू असल्यामुळे विजयकडून आशा आहेत.’’ रहाणेचे कौतुक करीत कोहली म्हणाला, ‘‘फलंदाज या नात्याने अजिंक्य माझी पसंती आहे. याशिवाय तो उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. (वृत्तसंस्था) कसोटी कर्णधार या नात्याने ही माझी पहिली मालिका असेल. बांगलादेशात केवळ एकच कसोटी खेळायची होती, त्यामुळे ती पूर्ण मालिका नव्हती. संघात अनेक चेहरे नवे आणि युवा आहेत. काहींना आपली कारकीर्द घडवायची असल्याने ही मालिका आमच्यासाठी आव्हानात्मक असेल. चांगली तयारी झाल्यास आणि जिंकायची दृष्टी बाळगून खेळल्यास लंकेत बीसीसीआयने दिलेल्या जबाबदारीच्या कसोटीवर खरा ठरण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. -विराट कोहली