ऑल स्टार क्रिकेट, वॉर्न वॉरियर्सने दिला सचिन ब्लास्टर्सला व्हाईट वॉश
By Admin | Updated: November 15, 2015 12:50 IST2015-11-15T12:45:49+5:302015-11-15T12:50:47+5:30
ऑल स्टार्स क्रिकेट टी -२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात वॉर्न वॉरियर्सने सचिन ब्लास्टर्सवर चार गडी राखून विजय मिळवत मालिकेत निर्भेळ यश मिळवले.

ऑल स्टार क्रिकेट, वॉर्न वॉरियर्सने दिला सचिन ब्लास्टर्सला व्हाईट वॉश
ऑनलाइन लोकमत
लॉस एंजेल्स, दि. १५ - ऑल स्टार्स क्रिकेट टी -२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात वॉर्न वॉरियर्सने सचिन ब्लास्टर्सवर चार गडी राखून विजय मिळवत मालिकेत निर्भेळ यश मिळवले. सचिनने २७ चेंडूत ५६ धावांची खेळी केली असली तरी सामन्यात विजय मिळवण्यात सचिन ब्लास्टर्सला अपयशच आले.
ख्यातनाम माजी क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या ऑल स्टार्स क्रिकेट टी - २० मालिकेतील तिसरा व अंतिम सामना अमेरिकेतील लॉस एंजेल्समध्ये रंगला. सचिन तेंडुलकरच्या सचिन ब्लास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सचिन व सेहवाग या सलामीच्या जोडीने संघाला दमदार अर्धशतकी सुरुवात करुन दिली. सेहवाग २७ धावांवर बाद झाल्यावर सचिनने धडाकेबाज खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. सचिन ५६ धावांवर बाद झाल्यावर जयवर्धनेने १८ चेंडूत ४१ तर गांगुलीने ३७ चेंडूत ५० धावांची खेळी केली. तर हूपरने २२ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. सचिन ब्लास्टर्सने २० षटकांत ५ विकेट गमावत २१९ धावा केल्या. वॉर्न वॉरियर्सतर्फे व्हिटोरीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
सचिन ब्लास्टर्सच्या २२० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या शेन वॉर्नच्या वॉर्न वॉरियर्सची सुरुवात फारशी चांगली नव्हती. अॅम्ब्रोजने पहिल्याच चेंडूवर मायकल वॉनला त्रिफळाचित केले. यानंतर सायमंड्सने १९ चेंडूत ३१ धावा केल्या. मा६ संघाच्या ५० धावा झाल्या असतानाच सायमंड्स बाद झाला. मॅथ्यू हॅडनही स्वस्तात तंबूत परतला. आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यावर वॉर्न वॉरियर्सची मदार कुमार संगकारावर होती. त्याने २१ चेंडूत ४२ धावा केल्या. संगकारा बाद झाल्यावर सचिन ब्लास्टर्सच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र त्यानंतर रिकी पॉटींग व जॅक कॅलिसने सहाव्या विकेटसाठी ८८ धावांची खेळी करत संघाला विजयाच्या समीप नेले. कॅलिसने ४७ तर पॉटिंगने नाबाद ४३ धावांची खेळी केली. वॉर्न वॉरियर्सने चार गडी व एक चेंडू राखून सचिन ब्लास्टर्सवर विजय मिळवला. कॅलिसला सामनावीराचा तर संगकाराला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.