कोहलीवर सर्व अवलंबून
By Admin | Updated: January 25, 2015 01:59 IST2015-01-25T01:59:50+5:302015-01-25T01:59:50+5:30
टीम इंडियातील स्टार फलंदाज विराट कोहलीला आगामी वन-डे वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावीच लागणार आहे़

कोहलीवर सर्व अवलंबून
राहुल द्रविड : आगामी वन-डे वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे
सिडनी : टीम इंडियातील स्टार फलंदाज विराट कोहलीला आगामी वन-डे वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावीच लागणार आहे़ कारण, भारतीय संघाला त्याच्याकडून विशेष अपेक्षा आहेत, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे़
द्रविड म्हणाला, ‘‘जर भारतीय फलंदाज क्रमवारीवर एक नजर टाकल्यास विराटवर हा संघ अवलंबून असल्याचे दिसून येते़ विशेष म्हणजे, सध्या वन-डे सामन्यांमध्ये भारताच्या सलामीवीरांना विशेष चमक दाखविता आलेली नाही़ अशा परिस्थितीत मधली फळी कोहलीलाच सांभाळावी लागेल़’’ यानंतर सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी अखेरच्या काही षटकांत आक्रमक खेळ करण्यास सक्षम आहेत, असेही द्रविडने सांगितले़
माजी कर्णधार द्रविड म्हणाला, ‘‘गोलंदाजीत अखेरच्या काही षटकांत भारतीय गोलंदाज कामगिरीत सातत्य राखू शकले नाहीत़ मोहंमद शमी, ईशांत शर्मा यांच्यात उत्कृष्ट गोलंदाजी करण्याची क्षमता आहे़; मात्र त्यांना त्याचा उपयोग करून घेता आलेला नाही़ तर, भुवनेश्वर उत्कृष्ट गोलंदाज आहे; मात्र त्यालाही अखेरच्या काही षटकांत गोलंदाजीवर नियंत्रण राखता आलेले नाही़ त्यामुळे वर्ल्डकपमध्ये त्यांना आपल्या गोलंदाजीत कमालीची सुधारणा करणे गरजेचे आहे़ (वृत्तसंस्था)
भारत फलंदाजीच्या जोरावर
जिंकू शकतो
या वेळी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आपला किताब कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे़ विशेष म्हणजे, भारतीय संघ फलंदाजीच्या जोरावर हा वर्ल्डकप जिंकू शकतो़ त्यासाठी कोहली, धोनी, शिखर धवन, सुरेश रैना, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांच्यासह इतर फलंदाजांनी आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडणे गरजेचे आहे़
ईशांतचा ‘जलद’ सराव!
सिडनी : भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने शुक्रवारी सिडनी क्रिकेट मैदानावर कसून सराव केला. सरावादरम्यान जलद माऱ्यावर भर दिला. जलद मारा आणि चेंडू पकडण्याची योग्य पद्धत यामुळे तो पुनरागमन करेल, असा विश्वास भारतीय व्यवस्थापकांना आहे. दुसरी समाधानाची बाब म्हणजे, संघाचे तांत्रिक संचालक रवी शास्त्री आॅस्ट्रेलियात संघाशी जुळले असून त्यांनी खेळाडूंशी संवादही साधला. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांवेळी शास्त्री भारतात होते. ईशांत आणि शास्त्री यांच्या आगमनामुळे संघाला प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे. भारताचा तिसरा सामना सोमवारी म्हणजे प्रजासत्ताकदिनी होत आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी ‘आॅस्ट्रेलिया डे’ असल्याने येथे राष्ट्रीय सुटी आहे. त्यामुळे या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी मैदानावर गर्दी करतील. सराव सत्रात विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. आश्विन मात्र सहभागी झाले नाहीत. ब्रिस्बेन येथील सामन्यादरम्यान रोहितला ‘हॅमस्ट्रिंग’चा त्रास सुरू झाला होता.