आॅलिम्पिक आशा जिवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2015 04:31 IST2015-07-05T04:31:38+5:302015-07-05T04:31:38+5:30
गोलरक्षक सविता पुनियाने प्रतिस्पर्धी संघांचे अनेक हल्ले हाणून पाडले आणि तिच्या या जबरदस्त कामगिरीच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने विश्व लीग सेमीफायनल्सच्या

आॅलिम्पिक आशा जिवंत
एंटवर्प : गोलरक्षक सविता पुनियाने प्रतिस्पर्धी संघांचे अनेक हल्ले हाणून पाडले आणि तिच्या या जबरदस्त कामगिरीच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने विश्व लीग सेमीफायनल्सच्या पाचव्या स्थानासाठी झालेल्या प्लेआॅफ लढतीत जपानवर १-0 अशी मात केली. त्यामुळे भारताच्या आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याच्या आशा जिवंत राहिल्या.
भारताकडून विजयी गोल राणी रामपाल हिने १३ व्या मिनिटाला केला. वंदना कटारिया हिचा फटका जपानच्या गोलरक्षकाने रोखला; परंतु राणीने रिबाऊंडवर चेंडू गोलपोस्टमध्ये पोहोचवला. तथापि, भारतीय संघाच्या विजयाची शिल्पकार ठरली ती सविता. जपानच्या स्ट्रायकर आणि भारताच्या गोलपोस्टदरम्यान सविता अभेद्य भिंतीसारखी राहिली. अंतिम क्वॉर्टरमध्ये जपानला ५ पेनल्टी कॉर्नर मिळाले; परंतु त्यानंतरही प्रतिस्पर्धी संघ सविताला चकवून एकही गोल करू शकले नाहीत.
भारतीय संघाने पहिल्या क्वॉर्टरमध्ये मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली आणि सविताने ३६ वर्षांनंतर प्रथमच आॅलिम्पिकला पात्र ठरण्याच्या भारताच्या आशा जिवंत ठेवल्या.
वेलेंसिया स्पर्धेतून जर्मनी, ग्रेट ब्रिटन आणि चीन यांनी तीन आॅलिम्पिक कोटा मिळवले आहेत. या स्पर्धेतूनदेखील तीन संघांना आॅलिम्पिक कोटा मिळणार आहे. त्याचप्रमाणे आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाने आॅलिम्पिकमधील आपले स्थान आधीच निश्चित केले आहे.
गेल्या वर्षी भारताने इंचियोन आशियाई स्पर्धेत कास्यपदकाच्या लढतीत जपानला नमवले होते. या प्रेरणादायी कामगिरीमुळे भारतीय संघाने आजच्या सामन्यात आत्मविश्वासाने सुरुवात केली. भारताने सामन्याच्या १३ व्या मिनिटाला गोल केला. लिलिमा मिंजने चेंडू वंदनाकडे सोपवला आणि तिने डाव्या बाजूने आक्रमण केले. वंदनाचा रिव्हर्स फटका गोलरक्षक सकियो असानो हिने रोखला; परंतु रिबाऊंडवर राणी रामपालने गोल करीत भारताला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.
जपानला २0 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु हाजुकी नगाईचा डिफ्लेक्शन गोलपासून दूर राहिले. भारताला २५व्या मिनिटाला गोल करण्याचा गोल्डन चान्स मिळाला. तेव्हा प्रतिस्पर्धी २ डिफेंडरोंच्या समोर त्यांचे तीन स्ट्रायकर्स सर्कलमध्ये होते; परंतु वंदनाच्या दिशाहीन पासमुळे ही गोल करण्याची संधी दवडली गेली. मध्यंतराच्या आधी जपानला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु संघ गोल करू शकला नाही. जपानने उत्तरार्धात बरोबरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. त्यांना ३८ मिनिटाला चांगली संधीही मिळाली; परंतु डिफेंडर मोनिकाने प्रतिस्पर्ध्यांचे हल्ले परतवून लावले.
सविताने एका जपानच्या खेळाडूचा एक फटका आपल्या शरीरावर घेतला आणि प्रतिस्पर्ध्यांचा हल्ला अपशयी ठरवला. मोनिकाला नंतर मैदानाबाहेर जावे लागले. त्यामुळे जपानने दबदबा निर्माण केला; परंतु त्यांना गोल करता आला नाही.