अक्षर पटेलची भारतीय संघात निवड
By Admin | Updated: October 15, 2014 04:29 IST2014-10-15T04:27:55+5:302014-10-15T04:29:16+5:30
इंडियन प्रीमिअर लीग व चॅम्पियन्स लीगमध्ये चमकदार कामगिरी करणारा फिरकीपटू अक्षर पटेलची वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी दोन वन-डे व एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली

अक्षर पटेलची भारतीय संघात निवड
नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग व चॅम्पियन्स लीगमध्ये चमकदार कामगिरी करणारा फिरकीपटू अक्षर पटेलची वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी दोन वन-डे व एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली. ईशांत शर्माला दुखापतग्रस्त मोहित शर्माच्या स्थानी १५ सदस्यांच्या संघात कायम
ठेवण्यात आले आहे. आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यापूर्वीच्या तीन वन-डे सामन्यांसाठीही त्याची निवड
झाली नव्हती. त्या वेळी त्याला विश्रांती देण्यात आली असल्याचे ‘बीसीसीआय’तर्फे स्पष्ट करण्यात आले होते.
धर्मशाला येथे १७ आॅक्टोबरला आणि कोलकाता येथे २० आॅक्टोबरला होणाऱ्या चौथ्या व पाचव्या वन-डे सामन्यांसाठी संघात बदल करण्यात आलेला नाही. पण, २२ आॅक्टोबरला कटक येथे होणाऱ्या टी-२० सामन्यासाठी संजू सॅमन्सन, मनीष पांडे व कर्ण शर्मा यांच्यासह काही नव्या दमाच्या खेळाडूंना १४ खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात आलेले आहे. अक्षर व पांडे यांना टी-२० संघात धवल कुलकर्णी व अंबाती रायडू यांच्या जागी स्थान देण्यात आलेले आहे. कुलकर्णी व रायडू यांचा इंग्लंड दौऱ्यात टी-२० संघात समावेश होता.
अक्षरने यंदा जून महिन्यात बांगलादेश दौऱ्यात तीन वन-डे सामने खेळले होते. त्यात त्याला केवळ एक बळी घेता आला. पण, अलीकडेच संपलेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत तो दुसरा सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू ठरला. त्याने पाच सामन्यांत ८ बळी घेतले.
कर्नाटकचा फलंदाज मनीष पांडे याला अद्याप आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. त्याने आयपीएलमध्ये शतकी खेळी केली आहे. त्याने आजतागायत १०६ टी-२० सामन्यांत २३७३ धावा फटकाविल्या आहेत.
भारत आणि विंडीज संघांदरम्यान सुरू असलेली पाच वन-डे सामन्यांची मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. कॅरेबियन संघाने कोची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळविला, तर भारतीय संघाने नवी दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या लढतीत सरशी साधत मालिकेत बरोबरी साधली. विशाखापट्टणममध्ये खेळला जाणारा तिसरा सामना हुडहूड चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आला. (वृत्तसंस्था)