वायुसेनेने दोन नेमबाजांना ताबडतोब कामावर बोलावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 06:31 IST2019-02-28T06:30:26+5:302019-02-28T06:31:00+5:30
भारत- पाकदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीचा विचार करता हा प्रोटोकॉल असल्याचे दोन्ही नेमबाजांनी सांगितले.

वायुसेनेने दोन नेमबाजांना ताबडतोब कामावर बोलावले
नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात सहभागी असलेले रविकुमार आणि दीपक कुमार या भारतीय नेमबाजांना वायुसेनेने त्वरित कामावर परतण्याचे आदेश दिले. भारत- पाकदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीचा विचार करता हा प्रोटोकॉल असल्याचे दोन्ही नेमबाजांनी सांगितले.
आयएसएसएफ विश्वचषकात कांस्य विजेता रविकुमारने सांगितले की, ‘वायुसेना क्रीडा नियंत्रण बोर्डाच्या सचिवाने आमच्याशी चर्चा करीत पुढील योजनांची माहिती जाणून घेतली, गरज भासल्यास मी सीमेवर जाण्यास सज्ज आहे.’ तसेच, ‘सराव आणि खेळाच्या तुलनेत नेहमी देशासाठी तत्पर असायला हवे,’ असे ज्युनियर वॉरंट अधिकारी असलेला रवी म्हणाला.
दीपक हा सार्जंट आहे. दोन्ही नेमबाजांना दहा मीटर एअर रायफल मिश्र प्रकाराच्या पात्रता फेरीत अपयश आल्यानंतर ते रेंज सोडून रवाना झाले. दीपक यावेळी म्हणाला की, ‘आम्हाला कमांडंरने पाचारण केले आहे. प्रत्येक स्पर्धा खेळल्यानंतर रिपोर्टिंगचा प्रोटोकॉल असतो. आम्हाला जे निर्देश मिळतील, त्याचे पालन करू.’ (वृत्तसंस्था)