पराभवानंतर ब्राझील बुडाला शोकलाटेत
By Admin | Updated: July 9, 2014 12:19 IST2014-07-09T11:50:26+5:302014-07-09T12:19:06+5:30
तब्बल पाचवेळा फूटबॉल वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावणा-या ब्राझीलला यावेळी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जर्मनीकडून लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागल्याने संपूर्ण ब्राझील दु:खाच्या लाटेत बुडाला आहे

पराभवानंतर ब्राझील बुडाला शोकलाटेत
>ऑनलाइन टीम
ब्राझीलिया, दि. ९ - तब्बल पाचवेळा फूटबॉल वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावणा-या ब्राझीलला यावेळी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जर्मनीकडून लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागल्याने संपूर्ण ब्राझील दु:खाच्या लाटेत बुडाला आहे. मंगळवारी जर्मनीने ब्राझीलचा ७-१ असा धुव्वा उडवत आठव्यांदा फिफा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली. नेयमार, सिल्वा या प्रमुख खेळाडूंविना उतरलेल्या ब्राझीलच्या संघाने जर्मनीसमोर सपशेल शरणागती पत्कारली.
ब्राझीलच्या पराभवाचा धक्का बसलेल्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले. मैदानात उपस्थित असलेले ब्राझीलच्या पाठीराख्यांना आपल्या संघाचा झालेला लाजिरवाणा पराभव पाहताना प्रचंड वेदना होत होत्या. जर्मनीने पाचवा गोल केल्यानंतर निराश झालेल्या अनेक जण हाफटाईम होण्यापूर्वीच आपल्या प्रचंड पैसे खर्च करून विकत घेतलेल्या जागा सोडून मैदानाबाहेर निघून गेले. उरल्या सुरल्या काही जण आपल्या संघाच्या 'सुमार कामगिरी'मुळे ओक्साबोक्शी रडताना दिसत होते. संपूर्ण देश शोकसागरात बुडाला.
ब्राझीलचा आत्तापर्यंतचा सर्वात दारुण पराभव
> फिफा विश्वचषकातील बलाढ्य संघ आणि चार वेळा विश्वविजेतेपद पटकावणा-या ब्राझीलचा हा आत्तापर्यंतचा सर्वात दारुण पराभव आहे. यापूर्वी १९९८ च्या अंतिम सामन्यात फ्रान्सने ब्राझीलचा ३-० तर १९३८ मध्ये पोलंडने ५-० असा पराभव केला होता. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर १९२० मध्ये उरुग्वेने ब्राझीलला ६-० ने धूळ चारली होती.
> २००२ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ब्राझील विरुद्ध जर्मनी हे संघ आमने सामने होते. त्यावेळी ब्राझीलने जर्मनीचा २-० ने पराभव केला. आता १२ वर्षानंतर याच जर्मनीने ब्राझीलचा त्यांच्या घरच्या मैदानातच दारुण पराभव केला.
> ब्राझीलने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सलग सहा वेळा विजय मिळवला होता. मात्र यंदा जर्मनीने त्यांची ही परंपरा मोडून काढली.
> सेमीफायनलमध्ये एखाद्या संघाचा ऐवढ्या मोठ्या फरकाने पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे.