द. आफ्रिकेचा विजयी ‘चौकार’
By Admin | Updated: October 11, 2016 04:40 IST2016-10-11T04:40:13+5:302016-10-11T04:40:13+5:30
वेगवान गोलंदाज आणि सामनावीर ठरलेल्या काएल एबॉटच्या (४/४०) भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने (६९) झळकावलेल्या

द. आफ्रिकेचा विजयी ‘चौकार’
पोर्ट एलिझाबेथ : वेगवान गोलंदाज आणि सामनावीर ठरलेल्या काएल एबॉटच्या (४/४०) भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने (६९) झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने सलग चौथा विजय मिळविताना जगज्जेत्या आॅस्टे्रलियाचा ६ विकेटने पराभव केला. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकाने ४-० अशी एकतर्फी आघाडी घेत कांगारुंना क्लीन स्वीप देण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.
रविवारी सेंट जॉर्ज पार्क स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पाहुण्या आॅस्टे्रलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, एबॉटने कर्णधार स्टीव्ह स्मिथचा निर्णय चुकीचा ठरवताना आॅसीच्या अॅरॉन फिंच - डेव्हिड वॉर्नर या आक्रमक सलामी जोडीला स्वस्तात बाद केले. यानंतर दबावाखाली आलेल्या आॅस्टे्रलियाची कामगिरी अखेरपर्यंत सुधारली नाही आणि ठराविक अंतराने यजमानांनी बळी घेत आॅस्टे्रलियाचा डाव ३६.४ षटकांत १६७ धावांमध्ये गुंडाळला. एबॉटने ४ बळी घेत आॅसीला धक्के दिले. तर, तबरेज शम्सी याने ३६ धावांत ३ बळी घेतले. आॅस्टे्रलियाकडून यष्टिरक्षक मॅथ्यू वेड (५२) आणि मिशेल मार्श (५०) यांनी कडवा प्रतिकार केला.
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना यजमानांची सुरुवातही अडखळती झाली. हाशिम आमला (४), क्विंटन डीकॉक (१८) झटपट परतल्यानंतर फाफ डू प्लेसिस (६९) जेपी ड्यूमिनी (२५) आणि रिली रोस्सो (नाबाद ३३) यांनी संघाला सलग चौथा विजय मिळवून दिला. आॅसीकडून ख्रिस टे्रमेन याने २ बळी घेतले. या मालिकेतील अखेरचा सामना १२ आॅक्टोबरला केपटाऊन येथे खेळला जाईल. (वृत्तसंस्था)