फिरकीपुढे आफ्रिकेचे लोटांगण
By Admin | Updated: November 27, 2015 23:57 IST2015-11-27T23:57:26+5:302015-11-27T23:57:26+5:30
रविचंद्रन अश्विन (७-६६) व अमित मिश्रा (३-५१) यांनी आपल्या फिरकीच्या जाळ्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अडकवले आणि भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी १२४ धावांनी विजय साकारत

फिरकीपुढे आफ्रिकेचे लोटांगण
भास्कर चौधरी, नागपूर
रविचंद्रन अश्विन (७-६६) व अमित मिश्रा (३-५१) यांनी आपल्या फिरकीच्या जाळ्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अडकवले आणि भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी १२४ धावांनी विजय साकारत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. सामन्यात १२ बळी घेणारा अश्विन सामनावीरचा मानकरी ठरला. भारतीय फिरकीपुढे द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा लोटांगण घातले.
मोहालीत पहिल्या कसोटी सामन्यात १०८ धावांनी विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने या लढतीत विजय मिळवित मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. बेंगळुरू कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत संपला होता. चौथा व अखेरचा कसोटी सामना नवी दिल्लीमध्ये ३ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. भारताने मायदेशात खेळताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९९६ मध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने तर २००४ मध्ये दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने विजय मिळवला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळवले.
भारताने दिलेल्या ३१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ८९.५ षटकांत १८५ धावांत संपुष्टात आला. कर्णधार हाशिम अमला (३९) व फॅफ ड्यूप्लेसिस (३९) यांनी पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करीत दक्षिण आफ्रिकेच्या आशा पल्लवीत केल्या होत्या, पण ही भागीदारी संपुष्टात येताच दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी उडाली. या मालिकेतील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. पाच वर्षांपूर्वी याच मैदानावर २५३ धावांची खेळी करणाऱ्या अमलाने २१९ मिनिट खेळपट्टीवर तळ ठोकताना १६७ चेंडू खेळले. अमलाला मिश्राने माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. कर्णधार माघारी परतल्यानंतर ड्यूप्लेसिसचीही एकाग्रता भंग झाली. पाच चेंडूंनंतर त्यानेही तंबूची वाट धरली.
मालिकेत वर्चस्व गाजवणाऱ्या अश्विनचा मारा खेळण्याचे तंत्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना या कसोटीतही गवसले नाही. अश्विनने दुसऱ्या डावात ६६ धावांच्या मोबदल्यात ७ बळी घेतले. त्याने या लढतीत ९८ धावांच्या मोबदल्यात एकूण १२ फलंदाजांना माघारी परतवले. अमित मिश्राने ५१ धावांत ३ गडी बाद केले. मिश्राने उपाहारानंतर सहा चेंडूंच्या अंतरात अमला व ड्यूप्लेसिस या जम बसलेल्या फलंदाजांना माघारी परतवत भारताचा विजय निश्चित केला.
अश्विनने आज सुरुवातीपासून वर्चस्व गाजवत पहिल्या सत्रात डीन एल्गर (१८) व ए.बी. डिव्हिलियर्स (९) यांना बाद केले. दुसऱ्या सत्रात मिश्राने दोन महत्त्वाचे बळी घेत भारताला वर्चस्व मिळवून दिले. त्यानंतर अश्विनने अचूक मारा करीत डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जे.पी. ड्युमिनी (१९) आणि डेन विलास (१२) यांना अश्विनने एकाच षटकात बाद केले. त्यानंतर अश्विनने रबाडाला कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले तर मोर्कलचा त्रिफळा उडवत भारताला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले.
> भारत पहिला डाव २१५. दक्षिण आफ्रिका पहिला डाव ७९. भारत दुसरा डाव १७३. >दक्षिण आफ्रिका दुसरा डाव : डीन एल्गर झे. पुजारा गो. अश्विन १८, स्टियान वान जिल झे. रोहित गो. अश्विन ०५, इम्रान ताहिर पायचित गो. मिश्रा ०८, हाशिम अमला झे. कोहली गो. मिश्रा ३९, ए.बी. डिव्हिलियर्स पायचित गो. अश्विन ०९, फॅफ ड्यू प्लेसिस झे. व गो. मिश्रा ३९, जे.पी. ड्युमिनी पायचित गो. अश्विन १९, डेन विलास झे. साहा गो. अश्विन १२, सायमन हार्मर नाबाद ०८, कॅगिसो रबाडा झे. कोहली गो. अश्विन ०६, मोर्न मोर्कल झे. व गो. अश्विन ०४. अवांतर (१८). एकूण ८९.५ षटकांत सर्वबाद १८५. बाद क्रम : १-१७, २-२९, ३-४०, ४-५८, ५-१३०, ६-१३५, ७-१६४, ८-१६७, ९-१७७, १०-१८५. गोलंदाजी : ईशांत १५-६-२०-०, अश्विन २९.५-७-६६-७, जडेजा २५-१२-३४-०, मिश्रा २०-२-५१-३.
सकारात्मक वृत्तीमुळेच जिंकलो
नागपूर : ‘माझ्यासह सर्वच सहकाऱ्यांनी अखेरपर्यंत सकारात्मक वृत्ती बाळगल्याने मालिका विजयाचा ऐतिहासिक क्षण पाहता आला’, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली आहे. भारताने व्हीसीएवर द. आफ्रिकेचा विदेशातील नऊ वर्षे अपराजित राहण्याचा विक्रम मोडीत काढून चार सामन्यांच्या मालिकेत २-० असा विजय साजरा केला. कर्णधार या नात्याने मायदेशात पहिला मालिका विजय नोंदविणारा कोहली पत्रकारांशी बोलताना म्हणाला, ‘पाहुण्या संघाला टी-२० आणि वन डे मालिका गमविल्यानंतर कसोटी मालिका जिंकणे वेगळा अनुभव ठरला.’
मालिकेचा हिरो ठरलेला आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याचे तोंडभरून कौतुक करीत कोहली पुढे म्हणाला, ‘अश्विन विश्व दर्जाचा गोलंदाज आहे. स्वत:च्या चेंडूवर नियंत्रण ठेवून प्रतिस्पर्धी फलंदाजाला स्थिरावण्याची तो संधी देत नाही. तो संघासाठी ‘हुकुमी एक्का’ सिद्ध झाला. जडेजा आणि मिश्रा यांनी देखील तितक्याच ताकदीने त्याला साथ दिली.
संघर्ष करीत हरलो : अमला
नागपूर : व्हीसीएवरील तिसऱ्या कसोटीत १२४ धावांनी झालेल्या पराभवासह एक कसोटी शिल्लक असताना भारताविरुद्ध चार सामन्यांची मालिका ०-२ ने गमविल्याने द. आफ्रिकेचा कर्णधार हशिम अमला कमालीचा निराश आहे. हा खराब निकाल असला तरी पराभव टाळण्यासाठी आम्ही कडवा संघर्ष केल्याचे अमलाचे मत होते. ‘हा पराभव स्तब्ध करणारा आणि निराशादायी ठरला. दौऱ्याची सुरुवात झकास केली मात्र शेवट निराशाजनक होत आहे.’ असे तो म्हणाला.
अमला पुढे म्हणाला, ‘मालिका गमविली हे खरे आहे पण संपूर्ण मालिकेत आम्ही संघर्ष केला. सर्वच सदस्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. अखेरपर्यंत हार न मानता विजयासाठी खेळलो हे माझ्यादृष्टीने मोठे काम आहे.’ अमलाने विजयाचे श्रेय भारताला दिले. तो म्हणाला, ‘खेळपट्टीवर कितीही टीका होत असली तरी भारतीय संघाकडून विजयाचे श्रेय हिरावून घेता येणार नाही.
विजयाच्या निर्धाराने खेळलो : अश्विन
प्रत्येक सामना विजयाच्या निर्धाराने खेळल्यामुळे विजयाचे स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने दिली. द. आफ्रिकविरुद्ध १२४ धावांनी शानदार विजयासह तिसरी कसोटी आणि मालिका जिंकून देणारा २९ वर्षांचा अश्विन ‘सामनावीर’ ठरला. कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी करीत (६६ धावांत ७ बळी) त्याने सामन्यात १२ तसेच तीन कसोटीच्या पाच डावांत सर्वाधिक २४ गडी बाद केले आहेत. तो म्हणाला, ‘खेळपट्टी आज काहीशी मंद जाणवली पण विजयाचे संकेत कालच मिळाले होते. हशिम अमला आणि फाफ डुप्लेसिस यांनी पाय रोवल्याचे ध्यानात येताच आम्ही अधिक निर्धाराने मारा केला. फलंदाज शतकाच्या इराद्याने खेळतो तसा मी सुद्धा चार किंवा पाच गडी बाद करण्याच्या निर्धाराने मारा करतो. ’
अश्विनने यंदा आठ सामन्यात ५५ गडी बाद करीत वर्षात सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.