वर्ल्डकप जेतेपदासाठी आफ्रिकाही दावेदार

By Admin | Updated: November 8, 2014 03:19 IST2014-11-08T03:19:59+5:302014-11-08T03:19:59+5:30

वर्ल्डकप जेतेपद कायम राखण्यासाठी भारताला आॅस्टे्रलिया आणि न्यूझीलंडचे कडवे आव्हान असेलच

Africa contenders for World Cup title | वर्ल्डकप जेतेपदासाठी आफ्रिकाही दावेदार

वर्ल्डकप जेतेपदासाठी आफ्रिकाही दावेदार

स्वदेश घाणेकर, मुंबई
वर्ल्डकप जेतेपद कायम राखण्यासाठी भारताला आॅस्टे्रलिया आणि न्यूझीलंडचे कडवे आव्हान असेलच; परंतु जगज्जेतेपदाच्या या शर्यतीत दक्षिण आफ्रिकाही प्रबळ दावेदार असेल, असे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग याने व्यक्त केले. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) निमित्ताने भारतात येणारा फ्लेमिंग शुक्रवारी न्यूझीलंड पर्यटनाच्या प्रसारासाठी मुंबईत आला. या वेळी त्याने ‘लोकमत’ कार्यालयालाही भेट दिली. एरवी बॅटने गोलंदाजांवर हल्लाबोल करणाऱ्या फ्लेमिंगने लोकमत टीमच्या प्रश्नांच्या गोलंदाजीवर दिलखुलास बोलंदाजी केली.
१९९२ साली आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी संयुक्तरीत्या वर्ल्डकपचे यजमानपद भूषविले होते. त्यानंतर जवळपास एका तपानंतर हा मान या दोन्ही देशांना मिळाला आहे. १३ वर्षांच्या कालावधीत न्यूझीलंडचा सर्वांगीण विकास झाला आहे. त्याचा यंदाच्या स्पर्धेवर काय परिणाम दिसेल, यावर फ्लेमिंग म्हणाला, की ९२ साली मिळालेल्या संधीतून आम्ही जगाला आमची ओळख करून देण्यात कमी पडलो होतो. परंतु, आता खूप बदल झाले आहेत आणि ती कसर या वेळी आम्ही भरून काढू. त्याची प्रचीती ख्राइस्टचर्च येथे होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यातून येईल. हा सोहळा इतका भव्य असेल, की त्यामुळे न्यूझीलंडची एक वेगळी ओळख निर्माण होईल. मग १४ फेब्रुवारीची वाट पाहा.
टी-२०च्या प्रभावामुळे वन डे क्रिकेटमध्ये फार बदल झाले आहेत. या झटपट फॉरमॅटमुळे फलंदाजांकडून धावांची आतषबाजी पाहायला मिळते. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये चांगलेच घमासान रंगणार आहे. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड संघांना घरच्या मैदानाचा फायदा मिळणार असल्याने जेतेपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव येणे साहजिकच आहे. परंतु भारतासह दक्षिण आफ्रिकाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे फ्लेमिंग म्हणाला. भारताकडून आॅस्ट्रेलियाला, तर श्रीलंकेकडून किवींना कडवे आव्हान मिळू शकते. या दोन्ही संघांव्यतिरिक्त आशिया खंडातील इतर संघांची कामगिरी प्रभावी होईल, असे वाटत नाही, अशीही भविष्यवाणी त्याने केली. असे असले तरी कोणत्याही संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Africa contenders for World Cup title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.