अफगाणिस्तानचा मालिका विजय
By Admin | Updated: February 28, 2017 04:02 IST2017-02-28T04:02:24+5:302017-02-28T04:02:24+5:30
झिम्बाब्वेचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १०६ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने सरशी साधली.

अफगाणिस्तानचा मालिका विजय
हरारे : आयपीएलसोबत जुळणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरलेल्या मोहम्मद नबीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने रविवारी पाचव्या व अखेरच्या वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १०६ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने सरशी साधली.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना ५० षटकांत ९ बाद २५३ धावांची मजल मारली. सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या रहमत शाह याने ५०, नबीने ४८, तर नूर अली जादरानने ४६ धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेतर्फे ख्रिस मोफूने तीन, तर रिचर्ड नगारवाने दोन बळी घेतले.
सामन्यात पावसाचा व्यत्यय निर्माण झाला होता. त्यानंतर झिम्बाब्वेला २२ षटकांमध्ये १६१ धावांचे लक्ष्य देण्यात आले. झिम्बाब्वेचा संघ १३.५ षटकांत ५४ धावांत गारद झाला. त्यांच्या केवळ दोन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. नबीने गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करताना
१४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. या व्यतिरिक्त आमिर हमजाने २० धावांच्या मोबदल्यात ३ आणि आयपीएलच्या लिलावामध्ये
चार कोटी रुपयांना करारबद्ध
झालेला फिरकीपटू राशिद खानने दोन षटकांत ८ धावांच्या मोबदल्यात
२ बळी घेतले. (वृत्तसंस्था)