फलंदाजी क्रम बदलल्याचा फायदा
By Admin | Updated: October 13, 2014 06:30 IST2014-10-13T06:26:56+5:302014-10-13T06:30:31+5:30
संघाच्या फायद्यासाठी फलंदाजीला ‘टू डाऊन’ उतरण्यास सहमती दर्शविणाऱ्या विराट कोहलीची भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रशंसा केली

फलंदाजी क्रम बदलल्याचा फायदा
नवी दिल्ली : संघाच्या फायद्यासाठी फलंदाजीला ‘टू डाऊन’ उतरण्यास सहमती दर्शविणाऱ्या विराट कोहलीची भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रशंसा केली. वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यातील ही रणनीती भविष्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. फलंदाजी क्रमातील बदलामुळे संघात ताळमेळ साधला गेला. कोहलीने ६२ धावांची खेळी करताना कारकिर्दीतील ३१वे अर्धशतक झळकाविले आणि सूर गवसल्याचे संकेत दिले. कोहलीने सुरेश रैनासोबत (६२) चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केल्यामुळे भारताने ५० षटकांत ७ बाद २६३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. भारताने दुसऱ्या लढतीत ४८ धावांनी विजय मिळवित मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
विजय मिळविल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘कोहली अनुभवी असून, संघाला काय अपेक्षित आहे, याची त्याला कल्पना आहे. नियमित स्थानापेक्षा एका स्थानाने खाली फलंदाजी करण्यासाठी त्याला तयार करण्यात यशस्वी ठरलो. संघाच्या हितासाठी हे आवश्यक असल्याचे त्याच्या लक्षात आहे. आम्हाला सर्वच बाबी तपासाव्या लागतात.’
कोहलीच्या स्थानी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अंबाती रायडूने ३२ धावांची उपयुक्त खेळी केली. धोनीनेही नाबाद ५१ धावा फटकाविल्या.
धोनी पुढे म्हणाला, ‘संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू पाचव्या, सहाव्या व सातव्या क्रमांकावर खेळणे संघासाठी हिताचे आहे. त्यामुळे विराटच्या फलंदाजी क्रमामध्ये बदल करण्यास मदत मिळाली. त्याला सूर गवसला. रायडूला लय गवसण्यासाठी वेळ मिळाला. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या रणनीतीवर प्रभाव पडला.’
फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजांनीही आपली भूमिका चोख बजावली. २६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीज संघ एकवेळ २ बाद १७० अशा सुस्थितीत होता. त्यानंतर सामनावीर ठरलेल्या मोहम्मद शमीने (४-३६) सलामीवीर ड्वेन स्मिथला (९७) तंबूचा मार्ग दाखवित भारतीय संघाला वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान केली. त्यानंतर लेग स्पिनर अमित मिश्रा (२-४०) आणि रवींद्र जडेजा (३-४४) यांनी विंडीजचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. धोनीने सर्वच गोलंदाजांची प्रशंसा केली.
धोनी म्हणाला, ‘या खेळपट्टीवर चेंडू असमतोल उसळत होता. आम्ही २० धावा कमी फटकाविल्या, पण गोलंदाजांनी अचूक मारा करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव कायम राखणे महत्त्वाचे होते. शमीने चांगला स्पेल केला. मिश्राने अचूक मारा केला, तर त्यानंतर जडेजाने आपली भूमिका चोख बजावली.’ (वृत्तसंस्था)