आदिती महाजनचे दिमाखदार तिहेरी मुकुट
By Admin | Updated: June 7, 2015 00:39 IST2015-06-07T00:39:55+5:302015-06-07T00:39:55+5:30
जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आदिती महाजन हिने तीन गटातून विजेतेपद पटकावत तिहेरी मुकूट संपादन केला. प्रथमेश हलणकर

आदिती महाजनचे दिमाखदार तिहेरी मुकुट
पुणे : जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आदिती महाजन हिने तीन गटातून विजेतेपद पटकावत तिहेरी मुकूट संपादन केला. प्रथमेश हलणकर, स्वराली चिटणीस व सिध्दी महाजन यांनी दोन गटाचे विजेतेपद मिळवत दुहेरी मुकूटाला गवसणी घातली.
क्लब सोलारीस क्लबच्या मयुर कॉलनी कोथरूड येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेच्या १९ वर्षाखालील मुलीच्या गटात आदिती महाजनने ऋचा कुलकर्णीचा १९-२१, २१-१३, २१-१७ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले. मुलींच्या १५ वर्षाखालील गटात दुहेरीत आदिती महाजनने सिध्दी महाजन हिच्या साथीत सारीका गोखले व इरा उंबरजे या जोडीचा २१-१६, २१-१६ असा पराभव केला. मुलींच्या १७ वर्षाखालील दुहेरीत आदिती व सिध्दी महाजन या जोडीने स्वराली चिटणीस-इशा जगताप यांचा २१-१४, २१-१५ असा पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. मुलींच्या १५ वर्षाखालील गटात स्वराली चिटणीसने आदिती महाजनचा २१-१६, २१-१७ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. मुलींच्या १९ वर्षाखालील दुहेरीमध्ये स्वराली चिटणीसने इशा जगतापच्या साथीत ऋचा कुलकर्णी व उन्नती मुनोत यांचा २२-२०, २१-२० असा पराभव केला.
मुलांच्या १५ वर्षाखालील गटात प्रथमेश हलणकर याने ओंकार लोणकरचा १३-२१, २१-१६, २१-१८ असा पराभव केला. तर १५ वर्षाखालील दुहेरीमध्ये प्रथमेश हलणकर व ए.राणे यांनी आयुष खांडेकर-सस्मित पाटील यांचा २१-१६, २२-२० असा पराभव केला. प्रथम वाणी, दर्शन पुजारी, सोहम कुलकर्णी, कुणाल वाघमारे, श्रीया उत्पत, ऋचा सावंत व ऋचा कुलकर्णी यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आपापल्या गटाचे विजेतेपद संपादन केले.