‘ह्युज’च्या पार्श्वभूमीवर ‘अॅडिलेड’ आव्हानात्मक
By Admin | Updated: December 5, 2014 23:46 IST2014-12-05T23:46:04+5:302014-12-05T23:46:04+5:30
आॅस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजच्या अपघाती मृत्यूचा प्रभाव भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पुढील आठवड्यापासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेवर पडणार असल्याचे संकेत मिळत आहे

‘ह्युज’च्या पार्श्वभूमीवर ‘अॅडिलेड’ आव्हानात्मक
सिडनी : आॅस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजच्या अपघाती मृत्यूचा प्रभाव भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पुढील आठवड्यापासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेवर पडणार असल्याचे संकेत मिळत आहे. यजमान संघाचे खेळाडू अॅडिलेड ओव्हलवर दाखल होतील त्यावेळी त्यांच्या मनावर आपल्या सहकाऱ्याच्या अपघाती मृत्यूच्या आठवणी दाटून येणार आहेत.
आॅस्ट्रेलियन खेळाडू ज्यावेळी पहिल्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरतील त्यावेळी काळी पट्टी बांधून आणि दोन मिनिटांचे मौन पाळून ह्युजला श्रद्धांजली अर्पण करण्याची त्यांची इच्छा राहील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
या दुख:द घटनेच्या मालिकेत प्रतिस्पर्धी म्हणून काही प्रभाव पडणार नाही, हे मात्र निश्चित. अॅडिलेडनंतर ब्रिस्बेन, मेलबोर्न आणि सिडनीमध्ये कसोटी खेळल्या जाणार आहेत. डॅरेन लेहमन यांच्या मार्गदर्शनाखाली आॅस्ट्रेलियन संघ आक्रमक झाला आहे. मिशेल जॉन्सनचे बाऊंसर संघासाठी महत्त्वाचे अस्त्र आहे.
उभय संघांच्या कर्णधारांबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून सावरत असलेला भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी शुक्रवारी रात्री उशिरा आॅस्ट्रेलियात दाखल होणार आहे तर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत असलेला आॅस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्क पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार अथवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यापूर्वी, आॅस्ट्रेलियात छाप सोडणारे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण आता संघात नसल्यामुळे युवा ब्रिगेडपुढे ही कसोटी मालिका म्हणजे आव्हान ठरणार आहे.
यजमान संघात जॉन्सन, रॅन हॅरिस आणि पिटर सिडल या गोलंदाजांमध्ये सामन्याचा निकाल फिरविण्याची क्षमता आहे. भारतातर्फे ईशांत शर्मा गोलंदाजांचे नेतृत्व करणार आहे. ह्युजच्या मृत्यूच्या घटनेमुळे मालिकेवर प्रभाव पडणार आहे. त्यामुळे यावेळी ‘मंकीगेट’सारखा वाद निर्माण होण्याची शक्यता धुसर आहे. उभय संघांच्या आक्रमकतेमध्ये थोडासा प्रभाव पडणार आहे. (वृत्तसंस्था)