अॅडम व्होग्स इस्पितळात!
By Admin | Updated: November 18, 2016 00:18 IST2016-11-18T00:18:18+5:302016-11-18T00:18:18+5:30
आॅस्ट्रेलियाचा फलंदाज अॅडम व्होग्स याच्या डोक्यावर चेंडू आदळताच गुरुवारी गंभीर अवस्थेत त्याला इस्पितळात दाखल करावे लागले.

अॅडम व्होग्स इस्पितळात!
पर्थ : आॅस्ट्रेलियाचा फलंदाज अॅडम व्होग्स याच्या डोक्यावर चेंडू आदळताच गुरुवारी गंभीर अवस्थेत त्याला इस्पितळात दाखल करावे लागले. स्थानिक शेफिल्ड शिल्ड सामन्यादरम्यान ही घटना घडल्याने फिलीप ह्यूज याच्या मनाला चटका लावून गेलेल्या मृत्यूची आठवण ताजी झाली.
व्होग्सला इस्पितळात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्या मेंदूवर आघात झाल्याचे निष्पन्न झाले. तो टास्मानियाविरुद्ध पश्चिम आॅस्ट्रेलियाकडून फलंदाजी करीत होता. आखूड टप्प्याचा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात असलेला ३७ वर्षांचा व्होग्स १६ धावांवर खेळत होता. टास्मानियाचा वेगवान गोलंदाज कॅमेरून स्टीव्हन्सन याचा बाऊन्सर व्होग्सच्या हेल्मेटवर आदळला. व्होग्स गुडघ्याच्या बळावर चक्क मैदानावरच बसला. वाका मैदानावर प्रथमोपचार झाल्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती इस्पितळाच्या सूत्रांनी दिली. वेस्टर्न आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेच्या मते, व्होग्सच्या जखमेचा तपास करण्यात आला. डोक्यावर जखम झाली असली तरी तो बरा आहे. इस्पितळातून सुटी झाल्यानंतर तो अन्य सामने खेळणार नसून विश्रांती घेईल. याआधी इंग्लिश कौंटीत मिडलसेक्ससाठी खेळताना मे महिन्यात सीमारेषेवरून थ्रो केलेला चेंडू व्होग्सच्या डोक्यावर लागताच तो जखमी झाला होता. (वृत्तसंस्था)