युवा संघात विजेतेपद पटकावण्याची क्षमता

By Admin | Updated: November 7, 2015 03:15 IST2015-11-07T03:15:31+5:302015-11-07T03:15:31+5:30

भारताचा ज्युनियर संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच मलेशियात झालेल्या स्पर्धेत भारताच्या युवकांनी दर्जेदार संघांचा समावेश असतानाही उपविजेतेपद पटकावले.

The ability to win a young team title | युवा संघात विजेतेपद पटकावण्याची क्षमता

युवा संघात विजेतेपद पटकावण्याची क्षमता

- रोहित नाईक,  मुंबई
भारताचा ज्युनियर संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच मलेशियात झालेल्या स्पर्धेत भारताच्या युवकांनी दर्जेदार संघांचा समावेश असतानाही उपविजेतेपद पटकावले. त्यामुळेच आगामी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघात विजेतेपद पटकावण्याची क्षमता आहे, असे भारताचा माजी हॉकीपटू वीरेन रस्किना याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मलेशिया येथे १४ नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या आठव्या ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा युवा संघ सज्ज असून, त्यानिमित्ताने वीरेनने आपले मत मांडले. याआधी मलेशिया येथेच झालेल्या सुलतान जोहोर स्पर्धेतही युवा भारतीय संघाने चमकदार कामगिरीसह उपविजेतेपद पटकावले होते. या कामगिरीचा
त्यांना फायदा होईल. प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांची मेहनत यात दिसून येत आहे. तसेच, ज्युनियर संघात अनेक गुणवान खेळाडू असून त्यांच्यात पुढील काही वर्षांत वरिष्ठ संघातून खेळण्याची क्षमता आहे, असेही वीरेनने सांगितले.
२००४च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये भारतीय संघातून खेळलेला वीरेन वरिष्ठ हॉकी संघाविषयी म्हणाला, की आज भारतीय हॉकी योग्य प्रकारे आपली वाटचाल करीत आहे. नुकताच न्यूझीलंड येथे झालेल्या मालिकेत भारताने चमकदार खेळ केला. रोलंट ओल्टमन्स यांच्या रूपाने जबरदस्त प्रशिक्षक मिळाला असून, माझ्या मते ते सर्वोत्कृष्ट आहेत. आॅलिम्पिकच्या दृष्टीने म्हणाल, तर आपल्याला सर्वप्रथम टॉप ६मध्ये येण्याचा प्रयत्न करावा लागेल.
२७ नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या विश्व हॉकी लीग स्पर्धेसाठी भारतीय संघाची धुरा अनुभवी सरदारसिंगवर सोपविण्यात आली आहे. याविषयी वीरेनने सांगितले, की सरदार अप्रतिम खेळाडू असून एक चांगला कर्णधार आहे. तो आपल्या नेतृत्वामध्ये आणखी प्रगती करू शकतो. मैदानावर प्रत्येक वेळी तो पुढाकार घेतो; परंतु कर्णधार म्हणून त्याने संघाचा आत्मविश्वास वाढवावा.
त्याचप्रमाणे संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नसून, प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव असून, त्यानुसार प्रत्येक
जण चमक दाखवेल, असा
विश्वासही वीरेनने या वेळी व्यक्त केला.


माझ्या मते, आॅलिम्पिकच्या दृष्टीने थेट पदकाची अपेक्षा करण्यापेक्षा आपण छोटे-छोटे लक्ष्य ठेवले पाहिजे. याआधी लंडन आॅलिम्पिकमध्ये आपण १२व्या स्थानी राहिलो होतो. तर, आता आपण अव्वल ६मध्ये येण्याचे लक्ष्य बाळगले पाहिजे. अशा टार्गेटमुळे आपल्याला मुख्य लक्ष्य गाठण्यात यश मिळेल.
- वीरेन रस्किना

Web Title: The ability to win a young team title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.