आशियाई स्पर्धेतून अभिनवचा ‘कांस्य’ निरोप
By Admin | Updated: September 24, 2014 04:06 IST2014-09-24T04:06:10+5:302014-09-24T04:06:10+5:30
आॅलिम्पिक या क्रीडाक्षेत्रातील जागतिक कुंभमेळ्यात भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणा-या अभिनव बिंद्राच्या आशियाई स्पर्धेतील कारकिर्दीची अखेर कांस्यपदकाने झाली

आशियाई स्पर्धेतून अभिनवचा ‘कांस्य’ निरोप
इंचियोन : आॅलिम्पिक या क्रीडाक्षेत्रातील जागतिक कुंभमेळ्यात भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणा-या अभिनव बिंद्राच्या आशियाई स्पर्धेतील कारकिर्दीची अखेर कांस्यपदकाने झाली. आज त्याला पुरुषांच्या १० मीटर एयर रायफलमध्ये वैयक्तिक गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिनवकडून या प्रकारात सुवर्णपदकाची अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नसली तरी कारकिर्दीतील अखेरच्या एशियाडमध्ये अभिनवच्या दृष्टीने एक गोष्ट किमान चांगली घडली... ती म्हणजे, आज मिळवलेले कांस्यपदक हे त्याच्या कारकिर्दीतील पहिले वैयक्तिक एशियाडपदक ठरले.
३१ वर्षीय अभिनवने १८७.१ असा स्कोअर केला. चीनचा १८ वर्षीय प्रतिभावान खेळाडू यांग हाओरन याने २०९.६ गुणांसह सुवर्णवेध घेतला. त्याने आपलाच संघसहकारी असलेल्या विश्वविजेता आणि वर्तमान आशियाई चॅम्पियन काओ यीफेई याला मागे टाकून आजचा दिवस गाजवला. यीफेईने २०८.९ गुणांसह रौप्यपदक मिळवले.
करिअरमधील अखेरच्या एशियाडमध्ये कांस्य जिंकून अभिनवने या स्पर्धेतील आपली निवृत्ती अविस्मरणीय केली. अभिनवने अखेरच्या प्रयत्नात १०.५ गुण मिळवले, तेव्हा कांस्यपदकाने हुलकावणी दिल्याची भावना झाल्याने तो बराच वेळ निराशपणे मान खाली घालून उभा राहिला. कारण, अटीतटीच्या क्षणी एक दशांशाचा फरकदेखील निर्णायक ठरू शकतो, याची जाणीव त्याला होती. मात्र, इराणच्या नेमबाजाला अखेरच्या प्रयत्नात ९.६ गुणच मिळवणे शक्य झाल्याने अभिनवने मोठा नि:श्वास टाकला... अशा तऱ्हेने अखेर या स्पर्धेतील पहिले वैयक्तिक पदक त्याच्या खात्यावर जमा झाले.(वृत्तसंस्था)