फिरकीच्या चक्रव्युहात भारताचा झाला 'अभिमन्यू'

By Admin | Updated: February 25, 2017 15:03 IST2017-02-25T09:49:00+5:302017-02-25T15:03:21+5:30

अन्य परदेशी संघांप्रमाणे फिरकी गोलंदाजी ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी ठरणार म्हणून भारताने फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवली.

'Abhimanyu' becomes India's spinner | फिरकीच्या चक्रव्युहात भारताचा झाला 'अभिमन्यू'

फिरकीच्या चक्रव्युहात भारताचा झाला 'अभिमन्यू'

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 25 - अन्य परदेशी संघांप्रमाणे फिरकी गोलंदाजी ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी ठरणार म्हणून भारताने फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवली. पण पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी रचलेल्या फिरकीच्या चक्रव्यूहात भारताचा अभिमन्यु झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत भारताचा 333 धावांनी दारुण पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.  
 
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 442 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव अवघ्या 107 धावात आटोपला. विजयासाठी कोणताही प्रयत्न करता भारतीय फलंदाजांनी ओकेफीच्या फिरकीसमोर अक्षरक्ष शरणागती पत्करली. भारताकडून चेतेश्वर पूजाराने सर्वाधिक (31) धावा केल्या. 
 
अन्य फलंदाज फक्त खेळपट्टीवर हजेरी लावून आले. पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही ओकेफीने सहा विकेट घेऊन भारतीय फलंदाजीचा कणा मोडले. लिऑनने चार गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या दोन फिरकीपटूंनी भारताचा संपूर्ण संघ गारद केला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 285 धावांवर संपुष्टात आल्यानंतर पहिल्या डावातील 155 धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 441 धावांचे लक्ष्य ठेवले. पण आत्मविश्वास हरवून बसलेला भारतीय संघ विजयासाठी झुंजण्याऐवजी बचावासाठी खेळतोय असे वाटत होते. 
 
भारताचे आघाडीचे फलंदाज मुरली विजय (2), लोकेश राहुल (10), कर्णधार विराट कोहली (13), अजिंक्य राहाणे (18) आणि रविचंद्रन अश्विन स्वस्तात बाद होऊन तंबूत परतल्याने भारताची अवस्था बिकट झाली. कोहली, विजय, राहाणे आणि अश्विनला ओकेफीने बाद केले तर, लोकेश राहुलचा विकेट लिऑनने घेतला.
 
ऑस्ट्रेलियाच्या दुस-या डावात कर्णधार स्टीव्हन स्मिथची शतकी खेळी  (109)  वैशिष्टय ठरली. भारतातर्फे उमेश यादवने ४, अश्विनने ३, जाडेजाने २ तर जयंत यादवने १ बळी टिपला. तिस-या दिवसाच्या खेळात आणखी 142 धावांची भर घालून ऑस्ट्रेलियाचे उर्वरित सहा फलंदाज बाद झाले.
 
खेळपट्टीवर ठाण मांडलेल्या कर्णधार स्मिथला रविंद्र जाडेजाने पायचीत पकडून माघारी धाडले. पण तो पर्यंत ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी घेतली होती. शनिवारी मिचेल मार्शच्या रुपाने ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी बाद झाला. त्यानंतर वाडे, स्मिथ आणि स्टार्क असे ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद होत गेले आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 285 धावांवर संपला.  तिस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर मिचेल मार्शच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का बसला. 31 धावांवर मार्शला रविंद्र जाडेजाने यष्टीरक्षक सहाकरवी झेलबाद केले. 
 
 

Web Title: 'Abhimanyu' becomes India's spinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.