न्यूझीलंडसमोर विजयासाठी 475 धावांचं आव्हान
By Admin | Updated: October 11, 2016 14:07 IST2016-10-11T13:57:37+5:302016-10-11T14:07:12+5:30
चेतेश्वर पुजाराने केलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 475 धावांचं आव्हान ठेवलं आहे

न्यूझीलंडसमोर विजयासाठी 475 धावांचं आव्हान
>ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. 11 - चेतेश्वर पुजाराने केलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 475 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताने बिनबाद 18 धावा केल्या होत्या. भारताने 216 धावांवर 3 गडी बाद असताना डाव घोषित केला. डाव घोषित केला तेव्हा चेतेश्वर पुजारा 101 तर अजिंक्य रहाणे 23 धावांवर खेळत होता. गौतम गंभीरने 56 धावांत सहा चौकारांसह 50 धावांची खेळी केली. गंभीरचं कसोटी कारकीर्दीतलं हे 22वं अर्धशतक ठरलं. अर्धशतक झळकावल्यानंतर गंभीर जीतन पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तिसरी कसोटी जिंकत संपुर्ण मालिकाच आपल्या खिशात घालण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे.
ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारताने इंदूर कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात 299 धावांवरच रोखलं. त्यामुळं भारताला पहिल्या डावात 258 धावांची आघाडी मिळाली होती. आश्विनने ८१ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. आश्विनने कारकिर्दीत २० व्यांदा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. आश्विनच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचा डाव २९९ धावांत संपुष्टात आला. सहा बळी घेणाऱ्या आश्विनने दोन फलंदाजांना धावबादही केले तर रवींद्र जडेजाने ८० धावांच्या मोबदल्यात उर्वरित दोन बळी घेतले.
भारताने पहिल्या डावात २५८ धावांची आघाडी घेतली असली तरी कर्णधार विराट कोहलीने किवी संघाला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. कोहली (२११) आणि अजिंक्य रहाणे (१८८) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर पहिला डाव ५ बाद ५५७ धावसंख्येवर घोषित करणाऱ्या यजमान भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 475 धावांचं आव्हान ठेवलं आहे.