ज्येष्ठांच्या छळाला कंटाळून ४ महिला जलतरणपटूंचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: May 7, 2015 12:02 IST2015-05-07T11:59:48+5:302015-05-07T12:02:55+5:30
केरळमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या जलतरण क्रीडा केंद्रातील चार महिला जलतरणपटूंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ज्येष्ठांच्या छळाला कंटाळून ४ महिला जलतरणपटूंचा आत्महत्येचा प्रयत्न
ऑनलाइन लोकमत
पुन्नामाडा (केरळ), दि. ७ - केरळमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या जलतरण क्रीडा केंद्रातील चार महिला जलतरणपटूंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील एका तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित तिघींची प्रकृती गंभीर आहे.
पुन्नामाडा येथे क्रीडा प्राधिकारणाचे जलतरण केंद्र असून या केंद्रातील चार जलतरणपटूंनी बुधवारी विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार समोर येताच या चौघींनाही स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशीरा यातील एका तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधीत तरुणींच्या नातेवाईकांनी जलतरण केंद्रातील वरिष्ठांकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर केंद्राच्या हॉस्टेल वॉर्डनने हे आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पिडीत मुलींच्या नातेवाईकांनी केली असून जोपर्यंत चौकशीचे आदेश दिले जात नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह स्वीकारणार नाही असा इशाराही तिच्या नातेवाईकांनी दिला आहे.