३० चेंडू ९३ धावा
By Admin | Updated: December 29, 2015 01:29 IST2015-12-29T01:29:55+5:302015-12-29T01:29:55+5:30
मार्टिन गुप्तिलच्या (९३ धावा, ३० चेंडू) आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेविरुद्ध केवळ ८.२ षटकांत १० गडी राखून विजय मिळवला.

३० चेंडू ९३ धावा
एकदिवसीयमधील दुसरे वेगवान अर्धशतक... ‘एबी’चा विक्रम कायम
ख्राइस्टचर्च : मार्टिन गुप्तिलच्या (९३ धावा, ३० चेंडू) आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेविरुद्ध केवळ ८.२ षटकांत १० गडी राखून विजय मिळवला. गुप्तिलचा वन-डेमध्ये वेगवान अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम थोडक्यात हुकला. पहिल्याच चेंडूवर सुदैवी ठरल्याचा लाभ घेत गुप्तिलने अर्धशतकी खेळीत ९ चौकार व ८ षटकार ठोकले.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाचा डाव २७.४ षटकांत ११७ धावांत संपुष्टात आला. पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यांनी हे लक्ष्य ३ गड्यांच्या मोबदल्यात २९ षटके शिल्लक राखून पूर्ण केले होते. श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला आज लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही. नुवान कुलसेखराने सर्वाधिक १९ धावांची खेळी केली. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्रीने चार तर मिशेल मॅक्लिनागनने ३ बळी घेतले.
26 एका षटकात धावा
गुप्तिलने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने नुवान कुलसेखराच्या एका षटकात १४ तर त्यानंतर दुष्मंता चामीराच्या पुढच्या षटकात २६ धावा वसूल केल्या.
त्याने केवळ १२ चेंडूंमध्ये ४६ धावा फटकावल्या होत्या, पण त्यानंतर त्याला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी आणखी पाच चेंडू खेळावे लागले. त्यामुळे त्याला १६ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकण्याचा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडण्यात अपयश आले. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान शतकी खेळीचा विक्रमही डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने जोहान्सबर्गमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३१ चेंडूंमध्ये हा पराक्रम केला होता.
लंकेची फलंदाजी ढेपाळली
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय श्रीलंकेच्या अंगलट आला. पाहुण्या संघातील फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांना समर्थपणे तोंड देण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरले. श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठण्यात अपयश आले. कुलसेकराने सर्वाधिक १९ धावांची खेळी केली. पहिल्या लढतीत चार बळी घेत, न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने लंकेला सावरण्याची संधी दिली नाही.
हेन्रीने ३३ धावांत चार बळी घेतले. डावाच्या चौथ्या षटकात त्याने तिलकरत्ने दिलशानला (७) टेलरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. हेन्रीने दिलशानव्यतिरिक्त दनुष्का गुणातिल्का, नुवान कुलसेखरा व सचित्रा सेनानायके यांना बाद केले.