स्वदेश घाणोकर - मुंबई
गेले दीड-एक वर्ष आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग न घेता आल्याने भारतीय बॉक्सर्सच्या मनगटात आलेली मरगळ दूर करणारी बातमी मंगळवारी धडकली. बॉक्सिंग इंडियाला मान्यता दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) बॉक्सर्सना आशियाई स्पर्धामध्ये राष्ट्रीय ध्वजाखाली सहभाग घेण्यास मंजुरी दिली आणि भारतीय बॉक्सिंगला नवचैतन्य मिळाले. हीच शिदोरी सोबत घेत भारतीय बॉक्सर्स आशियाई स्पध्रेत सर्वोत्तम कामगिरी करतील, असा विश्वास बॉक्सिंग इंडियाचे सचिव जय कवळी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
एआयबीएच्या या निर्णयाने आम्हा बॉक्सर्सना खूप आनंद झाला आहे. गेल्या दीड वर्षाच्या बंदीने जणू भारतातील बॉक्सिंग संपुष्टात येते की काय, असे वाटू लागले होते. मात्र हा निर्णय आशियाई स्पध्रेत चांगली कामगिरी करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असेही कवळी म्हणाले. एआयबीएच्या मान्यतेनंतर पुढचे पाऊल काय असेल यावर कवळी म्हणाले, की आता आम्हाला सर्व कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून भारत सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए) मान्यता मिळवायची आहे. एआयबीएने हिरवा कंदील दाखविल्यानंतर यात काही अडचण येईल असे वाटत नाही. येत्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण करू.
पुढील वाटचालीबद्दल विचारता ते म्हणाले, की सध्या तरी आम्ही बॉक्सर्ससाठी ‘चला उठा, कामाला लागा, झाले गेले विसरा’ असा सकारात्मक संदेश देण्यासाठी जास्तीत जास्त राष्ट्रीय स्पर्धाच्या आयोजनांवर भर देणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यात रायपूरला स्पर्धा होणार आहे. त्याच वेळी संघटनेच्या सर्व पदाधिका:यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार असून, त्यात पुढील वाटचाल ठरविण्यात येईल.
भारतीय हौशी मुष्टियुद्ध संघात (आयएबीएफ) गटबाजीमुळे अनेक वाद होत होते आणि त्याचा अप्रत्यक्ष फटका बॉक्सर्सना सोसावा लागला. या सर्व गटबाजीतून सुवर्णमध्य काढत पुन्हा नवी संघटना स्थापन करणो कितपत आव्हानात्मक होते, या प्रश्नावर त्यांनी सोपे उत्तर दिले. ते म्हणाले, हे काम सोपे नव्हते, पण तितके कठीणही नव्हते. हे खरे आहे की, संघटना गटांत विभागली गेली होती आणि त्यामुळे येथे चिखल साचला होता. तो साफ करण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे, असे सतत वाटत होते. त्यामुळेच या गटांत समेट घडवला आणि बॉक्सिंग इंडियाची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. यापुढे हे गट हेवेदावे विसरून सोबत राहतील.
पहिला विचार भारताचा..
बॉक्सिंग इंडिया संघटनेवर तुमच्या रूपाने एक मुंबईकर चेहरा मिळाला आहे आणि त्याचा फायदा मुंबईच्या खेळाडूंना मिळेल, या विचाराला कवळी यांनी छेद दिला. ते म्हणाले, मी राष्ट्रीय संघटनेवर आहे आणि प्रथम भारताचा विचार करेन. राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग सुधारली, तर नक्कीच प्रत्येक राज्यातील आणि मुंबईतील बॉक्सर्सना फायदा होईल. परंतु मुंबईच्या बॉक्सर्समध्ये निर्णय, निर्धार आणि मेहनत घेण्याची क्षमता असेल तर आणि तरच ते पुढे जातील.