डिव्हिलियर्सची शंभरावी कसोटी
By Admin | Updated: November 12, 2015 23:27 IST2015-11-12T23:27:23+5:302015-11-12T23:27:23+5:30
शानदार फॉर्मात असलेला दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना संस्मरणीय ठरवण्यासाठी उत्सुक आहे

डिव्हिलियर्सची शंभरावी कसोटी
बेंगळुरू : शानदार फॉर्मात असलेला दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना संस्मरणीय ठरवण्यासाठी उत्सुक आहे. भारताविरुद्धच्या मालिकेतील शनिवारपासून बेंगळुरूमध्ये प्रारंभ होत असलेला दुसरा कसोटी सामना डिव्हिलियर्सच्या कारकिर्दीतील १०० वा सामना असून पाहुणा संघ या कसोटीत डिव्हिलियर्सला विजयाची भेट देण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघाला मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताविरुद्ध १०८ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला दक्षिण आफ्रिका संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे.
मोहालीतील पाटा व कोरड्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय फिरकीपटूंचे आव्हान पेलवता आले नाही, पण चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी पाहुण्या संघातील फलंदाजांना दिलासा देणारी ठरू शकते. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान किमान तीन दिवस पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कसोटीमध्ये जगातील अव्वल फलंदाज डिव्हिलियर्स आपल्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना या मैदानावर खेळणार आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डिव्हिलियर्सला येथील खेळपट्टीची चांगली माहिती आहे. मोहालीमध्ये पहिल्या डावात सर्वाधित ६३ आणि दुसऱ्या १६ धावा फटकावणाऱ्या डिव्हिलियर्सला दोन्ही डावात लेग स्पिनर अमित मिश्राने बाद केले होते.
३१ वर्षीय डिव्हिलियर्स १०० वा कसोटी सामना खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा सातवा फलंदाज ठरणार आहे. डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिका संघातर्फे आतापर्यंत ९९ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व करताना ५१.९२ च्या सरासरीने ७६८५ धावा फटकावल्या आहेत. त्यात ३७ अर्धशतके आणि २१ शतकांचा समावेश आहे. डिव्हिलियर्स म्हणाला,‘पाहुणा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यास सज्ज आहे. पहिल्या लढतीत चुरस अनुभवाला मिळाली नाही, असे म्हणता येणार नाही, पण तिसऱ्याच दिवशी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे निराश झालो. आम्ही सकारात्मक विचार करीत असून मोहालीमध्ये प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही चांगला खेळ केला. आमच्या संघात लढवय्या वृत्ती आहे.
डेल स्टेन म्हणाला,‘माझा जीवलग मित्र डिव्हिलियर्सच्या १०० वा कसोटी सामन्याचा आनंद साजरा करण्यासाठी या कसोटीत खेळण्यास उत्सुक आहे.’(वृत्तसंस्था)