यादवनगरमध्ये महिलेला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2016 01:46 IST2016-06-15T01:46:59+5:302016-06-15T01:46:59+5:30
लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना मदत केल्याचा राग मनात धरून महिलेला जबर मारहाण झाल्याचा प्रकार यादवनगरमध्ये घडला आहे. सदर महिलेवर वाशीतील पालिका

यादवनगरमध्ये महिलेला मारहाण
नवी मुंबई : लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना मदत केल्याचा राग मनात धरून महिलेला जबर मारहाण झाल्याचा प्रकार यादवनगरमध्ये घडला आहे. सदर महिलेवर वाशीतील पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रामअशिष यादव व तीन महिलांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिघा येथील यादवनगर परिसरात रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्या ठिकाणी राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेने त्याच परिसरातील एका पीडित कुटुंबाला मदत केली होती. त्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर त्याच परिसरातील तरुणाने लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी सदर मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी त्या महिलेने मदत केली होती. यावरून जावेद नावाच्या तरुणाला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली. याचाच राग मनात धरून काही महिला व पुरुषांच्या जमावाने त्या महिलेला जबर मारहाण केली, तर मारहाण करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रामअशिष यादव हे देखील होते, असे पीडित महिलेचे म्हणणे आहे. त्यांनी शिवीगाळ करीत आपल्याला घराबाहेर खेचून आणल्यानंतर लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली, तसेच डोळ्यात मिरची पावडर टाकल्याचाही आरोप महिलेने केला आहे. या प्रकारात जखमी झालेल्या सदर महिलेवर वाशीतील मनपा रुणालयात उपचार सुरू आहेत.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलेला तरुण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून यादव यांचा कट्टर कार्यकर्ता आहे, तर मारहाण झालेली महिला शिवसेनेची कार्यकर्ती आहे. महापालिका पोटनिवडणुकीत देखील त्यांच्यात राजकीय वाद झाला होता. अशातच पीडित कुटुंबाची बाजू घेत त्यांना मदत केल्याचा राग मनात धरून यादव यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार सदर महिलेने पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार रामअशिष यादव यांच्यासह तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.