योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
By वैभव गायकर | Updated: September 13, 2025 17:56 IST2025-09-13T17:55:39+5:302025-09-13T17:56:26+5:30
आळेकरी यांना युकेस्थित ऑफ रोड सेंटर यांच्या माध्यमातून सेंटरचे मालक मीस्टर बेन आणि डॅनियल यांनी नवोकोरी केटीएम बाईक देऊ केली.

योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : जगभ्रमंतीला निघालेल्या नवी मुंबई मधील योगेश आळेकरी यांची दुचाकी 28 ऑगस्ट रोजी युके मधील नॉटिंगहॅम मधुन चोरीला गेली होती. याबाबत रीतसर तक्रार नोंदवून देखील 15 दिवस उलटूनही आळेकरी यांना त्यांची दुचाकी मिळाली नाही. या घटनेचे पडसाद राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय माध्यमांमध्ये उमटल्यानंतर अनेकांनी आळेकरी यांच्यासाठी सोशल मीडियावर मोहीम चालवली. यातून आळेकरी यांना नवी मोटरसायकल मिळाली असून ते पुढच्या प्रवासाला निघाले आहेत.
आळेकरी यांना युकेस्थित ऑफ रोड सेंटर यांच्या माध्यमातून सेंटरचे मालक मीस्टर बेन आणि डॅनियल यांनी नवोकोरी केटीएम बाईक देऊ केली. यामुळे योगेश यांचा आफ्रिका खंडाचा प्रवास सुरु राहणार आहे. दुचाकी चोरीला गेल्याने योगेश यांच्या पुढील प्रवासाबाबत साशंकता निर्माण झाली होती. दुचाकी सोबत योगेश यांचा भारतीय पासपोर्ट, मॅक बुक, 360 डिग्री कॅमेरा, कॅम्पिंगचे सामान, कपडे, रोख रक्कम, व्हिसा, महत्वाचे कार्ड, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आदी सर्वच चोरीला गेल्याने योगेश भारतात परत येण्याच्या विचारात होते. योगेश आळेकरी यांनी आजवर 17 देश गाठत तब्बल 18500 किमीचा प्रवास पूर्ण केला आहे.
नेपाळ, इराण, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, चीन, रशिया, युरोप, जर्मनी, बेल्जीयम, नॉर्वे यांसारख्या देशातून प्रवास केला आहे.आफ्रिका खंडात जवळपास 10 देशांना योगेश आळेकरी प्रवास करणार आहेत. वसुधैव कुटुंबकमचा संदेश देण्यासाठी आळेकरी ही भ्रमंती करत आहेत.
15 दिवसानंतर नॉटिंगहॅम पोलिसांना योगेश आळेकरी यांच्या दुचाकीचा शोध लावता आलेला नाही. याबाबत एका संशयिताला अटक देखील करण्यात आली होती. मात्र याबाबत विशेष काही माहिती मिळू शकली नसल्याने चोरटे अद्याप फरारच आहेत. युके सारख्या देशात एखाद्या चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद होऊन देखील चोरटे पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्यांची बाब असल्याचे आळेकरी म्हणाले.
मला नवीन केटीएम बाईक मिळाली असल्याने मी संबंधितांचा आभारी आहे. लवकरच माझा आफ्रिकेकडील देशांच्या प्रवासाला सुरुवात होईल. मला नवीन गाडी मिळाली असली तरी मला ती भारतात आणताना जवळपास तिप्पट किंमत विविध टॅक्स रूपाने मोजावी लागणार आहे. मात्र, माझा प्रवास मध्येच न थांबता पुढील मार्गावर असणार आहे याचा मला आनंद आहे.
- योगेश आळेकरी