स्वस्त भाजी विक्री केंद्राची वर्षपूर्ती

By Admin | Updated: December 25, 2015 02:35 IST2015-12-25T02:35:34+5:302015-12-25T02:35:34+5:30

निवडणूका आल्या किंवा भाजीपाला महाग झाला तर शासन व राजकिय पदाधिकारी स्वस्त भाजीपाला केंद्र सुरू करतात. परंतू एकही केंद्र नियमीतपणे सुरू रहात नाही.

Year of cheap vegetable sales center | स्वस्त भाजी विक्री केंद्राची वर्षपूर्ती

स्वस्त भाजी विक्री केंद्राची वर्षपूर्ती

नवी मुंबई : निवडणूका आल्या किंवा भाजीपाला महाग झाला तर शासन व राजकिय पदाधिकारी स्वस्त भाजीपाला केंद्र सुरू करतात. परंतू एकही केंद्र नियमीतपणे सुरू रहात नाही. परंतू नेरूळमध्ये ना नफा ना तोटा तत्वावर सुरू झालेले केंद्राला शुक्रवारी एक वर्ष होत आहे. गृहिणींसाठी दिलासा ठरलेल्या या केंद्राने वर्षपुर्तीसाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निधी देण्याचा संकल्प केला आहे.
मुंबईत अनेकवेळा शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळत नाही व दुसरीकडे ग्राहकांना मात्र जादा दराने भाजीपाला विकत घ्यावा लागतो. मध्यस्थांची साखळी वाढत असल्यामुळे शेतकरी व ग्राहक दोघांचेही नुकसान होत असते. बाजारभाव प्रचंड वाढले की शासन व एपीएमसीच्यावतीने स्वस्त भाजीपाला केंद्र सुरू केले जाते. राजकिय पदाधिकारीही स्वस्तभाजीपाला विक्री केंद्र उघडतात. परंतू एक महिन्यात केंद्र बंद केली जातात. पुन्हा ग्राहकांना जादा दराने भाजी घ्यावी लागते. नागरिकांना स्वस्त दरात भाजीपाला मिळवून देण्यासाठी नेरूळमधील प्रथमेश संस्थेचे प्रमुख व सामाजीक कार्यकर्ते महादेव पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सेक्टर ६ मध्ये स्वस्त भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले. २५ डिसेंबर २०१४ ला हा उपक्रम सुरू केला. प्रत्येक सोमवारी एपीएमसीमधून भाजी खरेदी केली जाते. वाहतूकिच्या खर्चाचा समावेश करून त्या भाजीची विक्री केली जात आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना स्वस्त दरात भाजी मिळतेच परंतू परिसरातील इतर भाजी विक्रेत्यांनाही कमी दरामध्ये विक्री करावी लागत आहे.
स्वस्त भाजीपाला विक्री केंद्रातून प्रत्येक आठवड्याला ८०० ते १००० किलो मालाची विक्री केली जात आहे. वर्षभरामध्ये तब्बल ४५ टन भाजीची विक्री झाली आहे. नियमीत भाजीविक्रेत्यांपेक्षा जवळपास अर्ध्या किमतीमध्ये व कांदा, बटाटा जवळपास ४० टक्के स्वस्त दराने विकला जात आहे. शुक्रवारी या उपक्रमास वर्ष होत आहे. या निमीत्त केंद्र चालविणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थीक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हा निधी नामं फाऊंडेशन किंवा मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपुर्द केला जाणार आहे. वर्षभर शेतात राबून शेतकरी भाजीपाला पिकवितो व पुर्ण देशवासीयांना पुरवितो. तो शेतकरीच अडचणीत असताना कर्तव्य म्हणून मदत केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Year of cheap vegetable sales center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.