कुस्ती खेळाडूंची फसवणूक सुरूच
By Admin | Updated: March 2, 2016 02:20 IST2016-03-02T02:20:13+5:302016-03-02T02:20:13+5:30
गोल्फ कोर्ससह क्रिकेट व फुटबॉलसाठी मैदान उपलब्ध करून देणाऱ्या सिडको व महापालिका कुस्ती खेळाकडे दुर्लक्ष करत आहे

कुस्ती खेळाडूंची फसवणूक सुरूच
नवी मुंबई : गोल्फ कोर्ससह क्रिकेट व फुटबॉलसाठी मैदान उपलब्ध करून देणाऱ्या सिडको व महापालिका कुस्ती खेळाकडे दुर्लक्ष करत आहे. २००५ पासून कुस्तीचा अत्याधुनिक आखाडा उभारण्याचे फक्त आश्वासन दिले जात आहे. परंतु प्रत्यक्षात जागा उपलब्ध करून दिली जात नाही. मैदानाअभावी शहरातील १०० पेक्षा जास्त कुस्ती खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त झाले आहे.
कोपरखैरणेमधील रा. फ. नाईक विद्यालयाच्या मैदानावर २००५ मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी नवी मुंबईमध्ये एक वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीचा आखाडा उभारण्याचे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक, सिडको व महापालिकेने दिले होते. याच मैदानामध्ये नुकतीच महापौर केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण स्पर्धेमध्येही महापौर सुधाकर सोनावणे यांनी नवी मुंबईमध्ये कुस्तीचा आखाडा उभारण्याचे सूतोवाच केले आहे.
गत ११ वर्षांपासून प्रत्येक वर्षी कुस्ती खेळाडू, कुस्ती शौकीन व संघटनांचे पदाधिकाऱ्यांमध्ये आता या आश्वासनामुळे असंतोष निर्माण होवू लागला आहे. देशाला वैयक्तिक खेळात पहिले आॅलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीसाठी मात्र छोटासा आखाडा तयार करण्यासाठी जागा दिली जात नाही. सिडको व महापालिका प्रशासनाने कुस्ती खेळ व खेळाडूंची उपेक्षाच केली आहे. कुस्तीमध्ये करिअर करण्याची जिद्द असणाऱ्या खेळाडूंना पुणे, कोल्हापूरला जावे लागत आहे. ज्यांना इतर शहरांमध्ये जाणे शक्य नाही त्यांना कुस्ती खेळच बंद करावा लागत आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त खेळाडूंचे करिअर आखाडा नसल्याने उद्ध्वस्त झाले आहे.
राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खेळाडू कृष्णा रासकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रक टर्मिनलमध्ये मोकळ्या जागेवर आखाडा तयार करून कुस्तीचा सराव करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला आखाडा पावसाळा आला की बंद करावा लागतो. पावसाळा संपला की लाखो रूपये खर्च करून पुन्हा आखाडा तयार करावा लागत आहे. खेळाडूंना पिण्यासाठी पाणीही उपलब्ध होत नाही. सराव झाल्यानंतर मातीने भरलेले अंग धुण्यासाठीही घरी जावे लागते. डासांचा उपद्रवामुळे खेळाडूंचे आरोग्य धोक्यात आले आहे. कुस्ती खेळाचा प्रचार करण्यासाठी परिश्रम करणारे सम्राट स्पोर्ट अॅकॅडमीचे अध्यक्ष बापू उणावणे यांनी नेरूळ सेक्टर ६ मधील शुश्रूषा हॉस्पिटलला लागून असलेल्या भूखंडावर एक वर्षापूर्वी आखाडा तयार केला होता. परंतु सदर आखाडा सिडको अधिकाऱ्यांनी बंद केला. या भूखंडाचा वापर आता कचरा टाकण्यासाठी होत आहे. (प्रतिनिधी)१ मार्च २०१५ मध्ये नेरूळमध्ये मोकळ्या भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात कुस्तीचा आखाडा तयार केला होता. २५ कुस्तीपटू तेथे सराव करत होते. परंतु सिडकोने जूनमध्ये पावसाळी शेडला परवानगी नाकारून आखाडा बंद करण्यास भाग पाडले. सिडकोच्या पायऱ्या झिजवूनही आखाड्यासाठी जागा दिली जात नाही. यामुळे आता कुस्ती खेळाडूंना आंदोलन करण्याशिवाय दुसरा मार्ग राहिलेला नाही.
- बापू उणावणे, अध्यक्ष, सम्राट स्पोर्ट क्लब