महानगरातील महाठगांची अशीही दुनिया
By Admin | Updated: February 29, 2016 01:59 IST2016-02-29T01:59:13+5:302016-02-29T01:59:13+5:30
मुंबई मायानगरी म्हणून देशभर ओळखली जाते. तथापि, येथे ठगदेखील भरपूर आहेत. अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्याने, या उच्चशिक्षणाचा ठगविण्यासाठी वापर करणारे

महानगरातील महाठगांची अशीही दुनिया
मनीषा म्हात्रे, मुंबई
मुंबई मायानगरी म्हणून देशभर ओळखली जाते. तथापि, येथे ठगदेखील भरपूर आहेत. अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्याने, या उच्चशिक्षणाचा ठगविण्यासाठी वापर करणारे महाभाग असो किंवा कमी किमतीत दागिने, वस्तू मिळवून देण्याचे आमिष असो, अनेकदा सामान्य मुंबईकर या फसवणुकीच्या जाळ्यात अडकले आहेत. कधीही न पाहिलेल्या अमेरिकन बॉण्डच्या नावाखाली कर्जाचे आमिष दाखवून, तर कुठे दैवी शक्तीच्या नावाखाली फसवणुकीचे दुकान उघडल्याचेही अनेकदा आढळून आले. सध्या मुंबईतील स्थानिक पोलीस
ठाण्यात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांपैकी २० टक्के गुन्ह्यांचे प्रमाण हे फसवणुकीचे आहे. गेल्या वर्षभरात आर्थिक गुन्हे शाखेत १०५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ५५ अब्जांहून अधिक रकमेवर या ‘महाठगां’नी डल्ला मारल्याची नोंद आहे.
झटपट पैसे कमावण्याच्या नादात हे उच्चशिक्षित महाठग नवनवीन शक्कल लढवितात. ठगांच्या नानाविध क्लृप्त्यांमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. च्२२ फेब्रुवारी - गिरगाव येथील मराठमोळ्या कुटुंबात वाढलेल्या टेंभेच्या उच्चभ्रू राहणीमानाने अनेकांचे डोळे विस्फारले होते. टेंभेचे वडील मंत्रालयात नोकरीला आहेत. टेंभेला मात्र नोकरी मिळत नव्हती. झटपट पैसा कमविण्यासाठी तिने दागिन्यांची हौस असलेल्या महिलांना टार्गेट करण्याचे ठरविले. कस्टम, जेट एअरवेजमध्ये कामाला असल्याचे सांगून तेथे पकडलेले गोल्ड कॉइन कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून ती महिलांची फसवणूक करू लागली. लग्नसमारंभ, बड्या पार्ट्या, पार्लरमध्ये ती महिलांशी ओळख करून घेई. तिच्याविरुद्ध जम्मू-काश्मीर, ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह विविध ठिकाणी २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दादर पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या.१५ डिसेंबर - लॉटरी, लकी ड्रॉ, नोकरीचे आमिष, बनावट वेबसाइटसह वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविण्याच्या नावाखाली, मुंबईसह देश-विदेशातील नागरिकांना नायजेरियन टोळी गंडा घालत होती. कुलाबा पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश केला. या टोळीचा म्होरक्या किंग फ्ली सध्या पसार आहे. व्हॉट्सअॅपवरून या टोळीचा कारभार चालत होता. मायकेल कलू इबे (३८), उगवू उचेना (३९), ओकाफॉर एमॅन्युअल ओएंका (२४), अन्थोनी विसडॉप (३६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. १४ मार्च २०१५ - स्वत:ला बियाणी ग्रुपचा सदस्य असल्याचे सांगून, उच्चशिक्षित अशोक बियाणी नावाच्या याने नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातला. फॉरेन फंडिंगच्या नावाखाली कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून, धनाढ्य व्यावसायिकांना कोट्यवधीचा चुना लावणे एवढेच त्याचे काम होते. या पैशांतून त्याने पवई येथील रेनेसॉ या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुलीचा विवाह पार पाडला. तब्बल ६० लाख रुपये त्याने या विवाहासाठी खर्च केले होते. च्२ फेब्रुवारी - मूळचा कोकणचा रहिवासी असलेला रूपेश चव्हाण उर्फ देशपांडे उर्फ प्रभूजी याने नोकरीअभावी मुंबईकडे मोर्चा वळविला. पदवीधर, इंग्रजीमध्ये उत्तम प्रभुत्व आणि अंगात भगवी वस्त्रे परिधान करून त्याने गावदेवी येथील प्रसिद्ध इस्कॉन मंदिराच्या बाहेर ठाण मांडले होते. दैवी शक्तीच्या नावाखाली मंदिरात येणाऱ्या भक्तांना कमी पैशांत घर, गाडी, दागिने मिळवून देण्याचे आमिष दाखवून तो गंडा घालण्यात तरबेज होता. एकाकडून घेतलेल्या पैशांतून दुसऱ्याला खूश करणे आणि त्याच्याकडून जास्त पैसे घेऊन पुढच्याची फसवणूक करणे हा त्याचा धंदा झाला होता. अखेर गावदेवी पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला. देशपांडेच्या घरातून तब्बल ८३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.च्२० फेब्रुवारी - कुणीही न पाहिलेल्या ३२०० कोटींच्या फेडरल रिझर्व्ह बॉण्डचे आमिष दाखवून पेशाने इंजिनीअर असलेल्या विकास अण्णे (३६) याने अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला. भारतीय चलनात ३२०० कोटी किमतीच्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बॉण्डचे आपण सर्वेसर्वा असल्याचा दावा तो करत होता. या बॉण्डची खरी प्रत कोणीही पाहिलेली नाही. मात्र या बॉण्डच्या जोरावर कोट्यवधी रुपयांची कर्जे देतो, असे सांगून त्याने मुंबईसह अहमदाबाद आणि बंगळुरू येथील तिघांना चक्क सव्वा कोटीचा गंडा घातल्याचे समोर आले. मुंबईतील एका तरुणाचा ग्रीन टेक्नोलॉजी प्रकल्पासाठी कर्जाचा शोध सुरू असताना अण्णेने स्वत:कडील फेडरल रिझर्व्ह बॉण्डचे छायाचित्र दाखवून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. हा बॉण्ड तारण ठेवून सिंगापूर, दुबई येथील वित्त कंपन्यांतून कोट्यवधी रुपयांची क्रेडिट लाइन आपण घेऊ शकतो, असे सांगून तब्बल ४० लाखांचा गंडा घातला. प्रभावी व्यक्तिमत्त्व, टापटीप राहणीमान असलेल्या व नेहमी पंचतारांकित हॉटेलात राहणाऱ्या अण्णेच्या आश्वासनाला या तरुणासह अनेक जण बळी पडले.गोल्डन भस्म... १५ फेब्रुवारी - आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली औषधात सुवर्णभस्म टाकल्याचे सांगून मुंबईकरांना लाखोंचा चुना लावण्यात येत होता. ठाण्यात गजानन आयुर्वेदिक क्लिनिकच्या नावाखाली बोगस डॉक्टरांनी हा दवाखाना उघडला होता. ही टोळी पालिका रुग्णालयाबाहेर आपले सावज शोधत असे. रिक्षा, टॅक्सीवाले रुग्णांच्या नातेवाइकांना या रुग्णालयाचा मार्ग दाखवण्याचे काम करीत. अशाच प्रकारे आझाद मैदान येथील गोविंद अपराज हे वयोवृद्ध दाम्पत्य नातीच्या उपचारासाठी या टोळीच्या जाळ्यात अडकले. मधामध्ये सुवर्णभस्म टाकल्याचे सांगून चक्क या टोळीने त्यांच्या हातात ९ लाखांचे बिल थोपविले. अशा प्रकारे त्यांनी अनेकांना गंडा घातला. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष दोनने ठाण्यातून ८ बोगस डॉक्टरांना अटक केली.