कामोठेतील उद्यानांची कामे प्रगतिपथावर

By Admin | Updated: December 7, 2015 01:23 IST2015-12-07T01:23:19+5:302015-12-07T01:23:19+5:30

कामोठे परिसरात अनेक वर्षांपासून रखडलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना नुकतीच सुरुवात झाली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण आठ उद्याने विकसित करण्यात येणार

Workshops in Kamasthe parks in progress | कामोठेतील उद्यानांची कामे प्रगतिपथावर

कामोठेतील उद्यानांची कामे प्रगतिपथावर

कळंबोली : कामोठे परिसरात अनेक वर्षांपासून रखडलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना नुकतीच सुरुवात झाली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण आठ उद्याने विकसित करण्यात येणार असून त्यापैकी चार ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. क्रीडांगणे व इतर सुविधांकरिता प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
सिडकोने नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघरनंतर कामोठा नोड विकसित केला आहे. बहुतांशी सेक्टर हे सिडकोने वाटप केलेल्या साडेबारा टक्के भूखंडावर उभारण्यात आले आहेत. सुरुवातीपासून या वसाहतीत पायाभूत सुविधांची वानवा आहे. रस्ते त्याचबरोबर इतर मूलभूत सुविधा सिडकोने दिल्या असल्या तरी त्यांच्या दर्जावर शंका व्यक्त होत आहे.
कामोठा नोडची लोकसंख्या दोन लाखांवर पोहचली आहे. मात्र तरीही रहिवाशांना पाणीटंचाई, भारनियमन आदी मूलभूत सुविधा भेडसावत आहेत. वीजवाहिन्या खुल्या असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. पदपथ फेरीवाल्यांनी हायजॅक केल्याने पादचाऱ्यांना चालण्याकरिता जागाच राहिली नाही. वसाहतीत मद्य विक्री करणाऱ्यांनी बाहेर शेड टाकून व्यवसाय सुरू केल्याने मद्यपींचा वावर वाढला आहे. परिणामी परिसरात महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
कामोठा विभागातील रहिवाशांना विविध सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी सिडको प्रशासनाने राखीव भूखंड ठेवले. परंतु या भूखंडाचा गेली कित्येक वर्षे विकास करण्यात आलेला नाही. याठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी १८ मैदाने, १७ बगिचे आहेत. मात्र विकासाअभावी लहान मुलांना खेळण्याकरिता एकही मैदान नाही. त्यांना त्याकरिता खारघर किंवा कळंबोली गाठावे लागते.
सामाजिक कार्यासाठी ११ जागा, अभ्यासिकेसाठी १ तर मार्केटसाठी २१ जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहे. परंतु ही सुविधा फक्त कागदावर, प्रत्यक्ष कामोठावासीयांना काहीही मिळाले नाही. यासंदर्भात वारंवार आवाज उठवल्यानंतर अखेर सिडकोने विकासाला सुरुवात केली
आहे.
सिडकोने महत्त्वाच्या ठिकाणी उद्यान विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. इतर भूखंडही लवकरात लवकर विकसित करावेत, अशी मागणी शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम यांनी केली आहे. शुक्रवारी शिवसेनेचे शिष्टमंडळ घेवून अधीक्षक अभियंता किरण फणसे यांची भेट घेणार असल्याचे निकम म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Workshops in Kamasthe parks in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.