बेलापूरमधील पादचारी पुलाचे काम सुरू
By Admin | Updated: February 25, 2017 03:20 IST2017-02-25T03:20:41+5:302017-02-25T03:20:41+5:30
गेली कित्येक वर्षे रखडलेल्या आयकर कॉलनी ते बेलापूर पादचारी पुलाचे काम तत्काळ पूर्ण करावे यासाठी रेल्वेची परवानगी मिळावी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत अखेर

बेलापूरमधील पादचारी पुलाचे काम सुरू
नवी मुंबई : गेली कित्येक वर्षे रखडलेल्या आयकर कॉलनी ते बेलापूर पादचारी पुलाचे काम तत्काळ पूर्ण करावे यासाठी रेल्वेची परवानगी मिळावी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत अखेर या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या महासभेत स्थानिक नगरसेविका सरोज पाटील यांनी लवकरात लवकर काम सुरू करण्याची मागणी केली होती. आयकर कॉलनीतील राहिवाशांना बेलापूर गावात जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्यासारखा जीवघेणा मार्ग अवलंबवावा लागत असून या पादचारी पुलामुळे नागरिकांची अडचण दूर केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता तसेच आयकर कॉलनीतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. हा जीवघेणा मार्ग ओलांडण्याशिवाय पर्याय नसून प्रशासनही याकडे गांभीर्याने लक्ष घालत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. याठिकाणी रेल्वे रूळ ओलांडताना अनेक अपघात घडल्याचेही परिसरातील नागरिकांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून पादचारी पुलाचे बांधकाम रखडले होते. मात्र, आता लवकरच या पुलाचे काम पूर्ण केले जाईल, अशी प्रतिक्रिया महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिली. मुंबई येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात यासंदर्भात बैठकीचे आयोजन करून या प्रश्नावर चर्चा करण्यात आली होती.
प्रवाशांच्या सुरक्षेकरिता स्थानकाच्या एका बाजूला कुंपण लावण्यात आले असून दुसऱ्या बाजूसही कुंपण घातले जाणार आहे. (प्रतिनिधी)