लॉकडाऊनमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:46 IST2020-07-27T00:46:43+5:302020-07-27T00:46:49+5:30
कामोठेकरांचा विरोध : टाळेबंदीचा फायदा घेतल्याने नाराजी

लॉकडाऊनमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : मानसरोवर रेल्वे स्थानकासमोर सिडकोच्या गृहनिर्माण उभारणी प्रकल्पाला कामोठेतील नागरिकांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. गृहनिर्माण प्रकल्प या जागेवर नको, अशी मागणी सिडकोकडे रहिवाशांनी केली आहे. टाळेबंदीचा फायदा घेत, सिडकोने पुन्हा काम सुरू केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
सिडकोकडून नवी मुंबईसह पनवेल परिसरातील बस टर्मिनलवरती पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधली जाणार आहेत. सिडकोने कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, खारघर या ठिकाणी वसाहती निर्माण करताना, सिडकोकडून वेगवेगळ्या कारणासाठी भूखंड रिकामे ठेवले होते. यात बस टर्मिनलसाठीही कॉलनीत प्लॉट ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर, मानसरोवर, खांदेश्वर, खारघर रेल्वे स्थानक येथेही जागा आहे.
घरकुल योजनेंतर्गत डिसेंबर महिन्यात ठेकेदाराने संबंधित जागा ताब्यात घेतले होती. मात्र, हा प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात यावा, याबाबत कामोठेकरांसह नागरी हक्क समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे, तसेच न्यायालयातही दाद मागण्यात आली आहे. नागरी हक्क समितीने पालकमंत्री आदिती तटकरे यांना देऊन काम बंद करण्याची मागणी केली आहे.
प्रकल्पाला आजही
तीव्र विरोध
बस व ट्रक टर्मिनलवरती बांधण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या जागेला आजही रहिवाशांकडून विरोध दर्शवला जात आहे. सिडकोचा एवढा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्नही विचारला जात आहे. लवकर काम बंद न केल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.