‘महिलांनी परिघापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज’
By Admin | Updated: March 9, 2017 02:37 IST2017-03-09T02:37:06+5:302017-03-09T02:37:06+5:30
महिला या भावी पिढीच्या प्रतिनिधी आहेत. सामाजिक बदल घडवत असताना त्याची सुरुवात त्यांनी स्वत:पासून करायला हवी. महिलांनी स्वत:भोवती चौकट आखून घेतली आहे.

‘महिलांनी परिघापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज’
नवी मुंबई : महिला या भावी पिढीच्या प्रतिनिधी आहेत. सामाजिक बदल घडवत असताना त्याची सुरुवात त्यांनी स्वत:पासून करायला हवी. महिलांनी स्वत:भोवती चौकट आखून घेतली आहे. त्यामुळे महिलांनी परिघापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे, असे मत सिडको भवन येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहीद कॅ. विनायक गोरे यांच्या मातोश्री तथा सुप्रसिद्ध साहित्यिका अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले. सिडको कर्मचारी संघटनेतर्फे महिला दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अनुराधा गोरे बोलत होत्या.
याप्रसंगी सिडकोच्या व्यवस्थापक विद्या तांबवे, पणन व्यवस्थापक मार्गजा किल्लेकर, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश तांडेल, सरचिटणीस जे. टी. पाटील, उपाध्यक्ष नरेंद्र हिरे व वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे उपस्थित होते.
आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिलावर्गाने नव्या विचारसरणीचा अवलंब केला पाहिजे, असे अनुराधा गोरे या वेळी म्हणाल्या. एक शहीद कॅप्टनची आई असल्याचा मला अभिमान असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश तांडेल मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आज सगळ्याच क्षेत्रात महिला सबला म्हणून कार्यरत आहेत. प्रगल्भ स्त्रीत्वाने जगाचे दायित्व स्वीकारले आहे. स्त्रियांचे कर्तव्य श्रेष्ठत्वाची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. या कार्यक्रमात महामंडळाच्या विकास कार्यात अमूल्य कामगिरी करणाऱ्या सिडको महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शैला अॅन्ड्र्यूज, व्यवस्थापक माहिती तंत्रज्ञान, बिंदू मुरलीधरन, वरिष्ठ परिवहन अभियंता, वैभवी महाकाळकर, सहयोगी नियोजनकार, आरती म्हात्रे, सहायक अभियंता, पूनम कोकस सहायक अभियंता यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिडको कर्मचारी संघटनेच्या सभासद स्नेहल कडू तर आभार प्रदर्शन सुलोचना कडू यांनी केले. या कार्यक्रमाला सिडकोतील वरिष्ठ अधिकारी, अभियंता आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)