Women are upset as there are hundreds of green gram and urad dal along with edible oil | खाद्यतेलासह मूग, उडीद डाळ शंभरीपार झाल्याने महिला नाराज

खाद्यतेलासह मूग, उडीद डाळ शंभरीपार झाल्याने महिला नाराज

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भाववाढीनंतर खाद्यतेल, डाळींच्या किमतीने शंभरी पार केली आहे.  त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले आहे. प्रत्येक वस्तूमागे ३० ते ५० रुपयांपर्यंत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. महागाई विरोधात नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.


कोरोनाच्या टाळेबंदीनंतर किराणामालाच्या दरात  चढ-उतार होत होता. परंतु गेल्या महिन्यापासून खाद्यतेलासह डाळींच्या किमतीने शंभरी पार केली आहे. सद्य:स्थितीत मूगडाळ १०१ रुपयांनी खरेदी करावी लागत आहे, तर उडीद दाळ ११४ रुपयांवर गेली आहे.  खाद्यतेलात लीटरमागे ४० रुपयांची भाववाढ झाली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडलेय. त्यात काहींच्या नोकऱ्या गेल्यात, तर काहीजण नोकरीच्या शोधात आहेत. 


त्यात महागाईच्या झळा बसत असल्याने रहिवाशी पूर्णपणे हतबल झाले आहेत. 
पेट्रोल, डिझेल, गॅसवाढ झाली. आता किराणामालात भाववाढ झाल्याने पोट भरावे तरी कशाने असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गॅस महागल्याने गृहिणी चुलीवर स्वयंपाक करत आहेत. कामावर जाताना गाडी घरी लावून बस तसेच खासगी वाहनांचा आधार घेतला जात आहे. डाळीने शंभरी पार केली असली तरी त्याकरिता पर्याय उरला नसल्याने रहिवाशांना किराणा माल खरेदी करावाच लागत आहे.  


मागील वर्षीच्या  आणि आताच्या किमतीत ३० ते  ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकले आहेत. 

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. आता तर खाद्यतेलासह डाळीच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे घर चालवणे कठीण झाले आहे. काम करून तुटपुंज्या मिळणाऱ्या मजुरीतून काय सामान खरेदी करावे हा मोठाच प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे हाताला काम नाही त्यात महागाईने कंबरडे मोडले आहे. 
    - सावित्रीबाई पवार, गृहिणी 

गत वर्षापेक्षा यंदा डाळ आणि तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे, तर गहू, साखरेच्या किमती  स्थिर आहेत. खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे, जास्त प्रमाणात माल खरेदी करणाऱ्या दुकानदारांना तोटा सहन करावा लागत आहे. मोठ्या दुकानात थोडेफार सामान स्वस्त मिळत असल्याने ग्राहक येथे गर्दी करतात. मात्र लहान दुकानदारांचे यात मरण होत आहे. 
    - सचिन गलानी, दुकानदार

Web Title: Women are upset as there are hundreds of green gram and urad dal along with edible oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.