लेडीज बार विरोधात महिला आक्रमक
By Admin | Updated: December 7, 2015 01:21 IST2015-12-07T01:21:02+5:302015-12-07T01:21:02+5:30
तुर्भे एपीएमसी परिसरात रहिवाशी वस्ती व उर्दु शाळेच्या समोर लेडीज बार सुरू करण्यात आला आहे. याविशयी रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे

लेडीज बार विरोधात महिला आक्रमक
नवी मुंबई : तुर्भे एपीएमसी परिसरात रहिवाशी वस्ती व उर्दु शाळेच्या समोर लेडीज बार सुरू करण्यात आला आहे. याविशयी रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बारबंद करण्यासाठी महिलांनी सह्यांची मोहीम राबविली असून महापालिका व पोलिस आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर डॉस बार पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे यापुर्वी बंद झालेले बारही सुरू होवू लागले आहेत. एपीएमसीजवळ राम लक्ष्मण टॉवर समोर यापुर्वी बाबा पॅलेस हा सर्वीस बार होता. काही दिवसापुर्वी येथील अशोका काँम्लेक्समध्ये लाईट नाईट नावाचा नवीन बार सुरू झाला आहे. माथाडी कामगार व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या ए २ टाईप चाळीच्या गेटसमोरच हा बार आहे. बारच्या बाजूला असणाऱ्या मेडीकलमध्ये व किराणा दुकानांमध्ये रहिवाशांना नियमीत यावे लागत आहे. लेडीज बार सुरू झाल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महिलांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. नवीन बारच्या समोरच उर्दु माध्यमाची शाळा आहे. शाळेच्या समोरच बारचा बोर्ड दिसत आहे. शाळेच्या जवळ अशा बारला परवानगी नको अशी भुमीका रहिवाशांनी घेतली आहे. यापुर्वी राम रक्ष्मण टॉवरसमोर बाबा पॅलेस हाही सर्वीस बारअसून त्याविषयी यापुर्वीच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवाय याच ठिकाणी दारूविक्रीचे दुकान आहे. रात्री अनेक वेळा दुकानासमोरच काहीजण दारू पित असल्याचे चित्र दिसत असते.
तुर्भे परिसरातील लेडीज सर्वीस बार बंद करण्यात यावा यासाठी संकल्प सामाजीक संस्थेने सह्यांची मोहीम राबविली आहे. ए २ टाईप वसाहतीमधील ५७० सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहसचीव, महापालिका व पोलिस आयुक्त यांना देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी याविषयी माहीती देताना सांगितले की रहिवाशी वसाहतीजवळ व शाळेच्या समोर लेडीज बारला परवानगी दिल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाने तत्काळ सर्वीस बार बंद केला नाही तर महिला तिव्र आंदोलन करणार आहेत.